महिला अत्याचाराच्या ९५ टक्के गुन्ह्यांची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला अत्याचाराच्या ९५ टक्के गुन्ह्यांची उकल
महिला अत्याचाराच्या ९५ टक्के गुन्ह्यांची उकल

महिला अत्याचाराच्या ९५ टक्के गुन्ह्यांची उकल

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्यांत महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांपैकी जवळपास ९५ टक्के गुन्ह्यांची पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे. यात लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या गुन्ह्यांचा सर्वात जास्त समावेश आहे.
आयुक्तालय स्थापनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये महिलांची छेड काढणे, अत्याचार, मारहाण, अभद्र भाषा वापरणे, अश्लील वक्तव्य अशा प्रकारचे अनेक गुन्हे आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल असलेल्या कलम ३७६ व इतर तसेच कलम ३५४ व इतर सर्व गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून जवळपास ९५ टक्के गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे.
यंदा गेल्या नऊ महिन्यांत लैंगिक अत्याचाराचे एकूण ११९ गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी सर्व गुन्हे उघडकीस आणत ९३ आरोपींना अटक केली आहे. लैंगिक अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत एकूण १४७ गुन्हे दाखल असून हे सर्व गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी ११४ आरोपींना अटक केली आहे. विनयभंगाचे एकूण ३२४ गुन्हे दाखल असून त्यापैकी ३०४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यात १८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत १०३ गुन्हे दाखल असून त्यापैकी १०२ गुन्हे उघडकीस आले असून ९५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
..
पोलिसांच्या महिला सुरक्षेबाबत उपाययोजना
पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. रात्री उशिरा कामावरून घरी येणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. याला आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यामध्ये अंमलदार देखील नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच गस्त, ११२ हेल्पलाईन, भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देणे, त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता ‘भरोसा सेल’ची स्थापना करण्यात आली आहे.