यंदा चार लाख गोरगरिब कुटुंबियांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा चार लाख गोरगरिब कुटुंबियांची दिवाळी गोड
यंदा चार लाख गोरगरिब कुटुंबियांची दिवाळी गोड

यंदा चार लाख गोरगरिब कुटुंबियांची दिवाळी गोड

sakal_logo
By

वसई, ता. १३ (बातमीदार) : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत अनेकांचे कंबरडे मोडले, पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सण-उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत. मात्र, उत्सवांच्या काळात वाढत्या महागाईचे चटके गोरगरीब जनतेला बसत आहेत. राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत रवा, साखर, चणाडाळ आणि तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा पालघर जिल्ह्यातील ४ लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना मिळाला आहे. यामुळे दिवाळीनिमित्त गोडाधोडाचे पदार्थ तयार करण्यासाठी गरीब कुटुंबीयांना त्याचा फायदा होणार आहे.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल कुटुंबे आहेत. त्यांना सण साजरे करताना हात आखडता घ्यावा लागतो. महागाईमुळे त्यांना दिवाळी कशी करायची, ही चिंता भेडसावते. अशातच पालघर जिल्ह्यातील पुरवठा विभागाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांची यादी तयार करून आवश्यक शिधा जिन्नस संच तयार केले आहेत. दिवाळीत बेसनाचे लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळ्या, करंजी यासह विविध पदार्थ तयार केले जातात; परंतु महागाईमुळे गोरगरिबांना मात्र यापासून दूर राहावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने यंदा अशा घटकांना दिवाळीची गोड भेट दिली आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर यांचे प्रत्येकी एक-एक किलो, तर एक लिटर तेल असे पॅकेज मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना याचे वसई तालुक्यात अधिक लाभार्थी आहेत. सरकारच्या योजनेमुळे पालघर जिल्ह्यातील गरजूंची यंदाची दिवाळी आनंदात जाणार आहे.
--------------
पालघर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील चार लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना रवा, तेल, चणाडाळ व साखर याचे पॅकेट वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे.
- पी. के. ओमासे, जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर  
---
महागाईत दिवाळीचा आनंद
एकीकडे कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले. अशा परिस्थितीत महागाईने डोके वर काढले असताना गोरगरिबांची जगायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे; पण दिवाळी साजरी करण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत प्रशासन जात असल्याने महागाईत काही प्रमाणात तरी दिवाळीचा आनंद घेता येणार असल्याने नागरिक सुखावले आहेत.
---------------
शिधापत्रिकाधारकांची संख्या
तालुका -  अंत्योदय अन्न योजना - प्राधान्य कुटुंब लाभार्थी  
जव्हार  - १३४८७ - १२९६०
मोखाडा  - १०६९७ - ८४८२
विक्रमगड  - १६२१९ - ९६९३
वाडा  - ९९३६ - १८५९५
तलासरी - ९१०७ - १५५२१
डहाणू  - २०५९७ -   ३९९६१
पालघर  - १५६६९ - ६७०१०
वसई - ३७१४ - १३२६००
----------------------
एकूण  - ९९४२६ - ३०३७२२