कोस्टल रोडचे भवितव्‍य अधांतरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोस्टल रोडचे भवितव्‍य अधांतरी
कोस्टल रोडचे भवितव्‍य अधांतरी

कोस्टल रोडचे भवितव्‍य अधांतरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : शहरात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गायमुख खारेगाव कोस्टल रोडला महत्त्‍व प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने या कामाला गती देण्यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मार्गात बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वनविभागाला हस्तांतरित करण्यासाठी सातारा, महाबळेश्वर १५ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती; मात्र त्या ठिकाणी स्थानिकांचा विरोध होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पालघर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या मार्गातील अडथळे दूर होणार असले, तरी तूर्तास या प्रकल्‍पाचे भविष्‍य अधांतरीच असल्‍याचे चित्र आहे.

बहुचर्चित गायमुख-खारेगाव कोस्टल रोड या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने तयार करून त्यासाठी एक हजार २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. एमएमआरडीएकडून याचे काम केले जाणार आहे. हा कोस्टल रोड १३ किलोमीटरचा आहे. दरम्यान, या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या सल्लागाराने केलेल्या सर्वेक्षणात पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच वनविभाग व इतर विभागाच्या परवानगींसाठी प्रस्ताव सादर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. दुसरीकडे बाळकुम ते गायमुख असा रस्ता कण्याकामी कांदळवन क्षेत्र बाधित होणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वनविभागाला स्तांतरित करण्यासाठी पालिकेने वनविभागाकडे तीन जागांचा पर्याय दिला होता. त्यातील गडचिरोलीची जागा वनविभागाने नाकारली होती. त्यानंतर आता महापालिकेने सातारा-महाबळेश्वर येथील वलवन या गावातील १५ हेक्टर जागा वनविभागाला दाखवली असून, काही दिवसांपूर्वी वनविभागाने या भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आता या जमिनीचा सर्व्हेदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. येत्या आठवडाभरात हा सर्व्‍हे पूर्ण झाल्यानंतर जमिनीसाठीचा मोबदला हा रेडीरेकनरप्रमाणे दिला जाणार असून, या ठिकाणी किती आणि कोणत्या प्रकारची वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे, याची माहिती वनविभाग देणार असून त्याचा खर्चदेखील पालिका करणार आहे. दुसरीकडे या जागेला स्थानिकांनी विरोध केला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोस्टल रोडचे भवितव्य पुन्हा अधांतरित असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यासह अन्‍य ठिकाणी जागांचा शोध
ठाणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्‍वाच्‍या असलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. त्यामुळे आता, केवळ एकाच जागेचा पर्याय न ठेवता किमान तीन जागांचा पर्याय तयार ठेवण्यात यावा. यासाठी पालघर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील जागांचा शोध पालिकेकडून घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

.................
कोट :-
कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी आम्ही साताऱ्यातील जागेचा पर्याय सोडलेला नाही. तसेच जागा शोधण्यात खर्ची पडणारा वेळ वाचवून एक तरी जागा अंतिम होऊन हा मार्ग पुढे सरकण्यास मदत होईल. त्यामुळे पालघर आणि इतर जागांचादेखील शोध घेतला जात आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे पालिका