सर्दी खोकल्याने नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्दी खोकल्याने नागरिक हैराण
सर्दी खोकल्याने नागरिक हैराण

सर्दी खोकल्याने नागरिक हैराण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळामुळे सर्दी-खोकल्याची साथ वेगाने पसरत आहे. सर्दी-खोकल्याच्या आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील चौकाचौकांत असलेल्या दवाखान्ं‍यामध्ये रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे सर्दी-खोकल्याचे असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे डेंगीच्या आजाराची साथ डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ९९ डेंगीच्या रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्‍य विभागाने दिली.

जिल्ह्यात सकाळी ऊन, तर संध्याकाळी पाऊस अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणाच्या बदलामुळे सगळीकडे सर्दी-खोकल्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. विशेष म्हणजे सर्दी-खोकल्याचा आजार रुग्णांमध्ये आठवड्यापेक्षाही जास्त दिवस राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्दी-खोकल्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील, शहरातील चौकाचौकांत लहान दवाखान्ं‍यामध्ये दिवसाला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे सर्दी-खोकल्याचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या रुग्णांना औषधांसह वाफ घेण्याचे तसेच थंड पेयाचे सेवन करू नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ९९ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंगीचे संसर्ग होण्याचे प्रमाण सध्या २५ ते ३० टक्के आहे, असे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तीनपेक्षा अधिक दिवस ताप येणे, थंडी तसेच शरीरावर चट्टे उठणे ही डेंगीची लक्षणे आहेत. अशी लक्षणे एखाद्या रुग्णास आढळून आल्यास त्याला रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
...............................

डोळ्यांचीही साथ
डेंगी आणि सर्दी, खोकल्यासह डोळ्यांची साथही मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. डोळ्यांच्या संसर्गामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांची लागण होत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीस डोळा आला आहे, त्याने स्वत:चे विलगीकरण करून घेणे गरजेचे आहे. तसेच सतत डोळ्यांवर थंड पाण्याचा हात फिरवावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
---------------------------
डेंगीबाधित रुग्णसंख्‍या
ठाणे ४५
कल्याण-डोंबिवली ३४
अंबरनाथ ८
ठाणे ग्रामीण ६
भिवंडी ४
नवी मुंबई १
मिरा-भाईंदरमध्ये १
एकूण ९९