शौचालय कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौचालय कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा
शौचालय कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

शौचालय कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By

शौचालय कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा
ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश; कोपरी-कोळीवाडा पाहणी दौरा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाड्यातील शौचालयांच्या अस्वच्छतेबद्दल कंत्राटदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. वस्ती स्वच्छतागृह, तसेच विसर्जन घाट येथील सार्वजनिक शौचालय यांची देखरेख व स्वच्छता करण्यासाठी कोणीही उपस्थित नसणे, नळांना गळती लागून पाणी वाया जाणे, शौचकुपातील अस्वच्छता याबद्दल नाराजी व्यक्त करून आयुक्त बांगर यांनी बुधवारी (ता. १२) पहिल्याच पाहणी दौऱ्यात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा आढावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. बुधवारी कोपरी ते आनंदनगर परिसरात प्रथमच त्यांनी दौरा केला. चेंदणी कोळीवाडा, हरियाली तलाव, अष्टविनायक चौक हा भाग त्यांनी फिरून पाहिला. प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक प्रकल्प, स्वच्छता, रस्त्याच्या कडेला असलेला कचरा आदींबद्दल त्यांनी नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना सूचना केल्या.
दरम्यान, कोळीवाडा वस्ती स्वच्छतागृहातील पाण्याची गळती, शौचकूप आणि व्हरांड्यातील अस्वच्छता, तसेच देखभाल करण्यासाठी कोणीच हजर नसणे, याबद्दल आयुक्त बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाच प्रकार कोपरी-मीठबंदर विसर्जन घाट परिसरात असलेल्या स्वच्छतागृहातही होता. या दोन्ही स्वच्छतागृहांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले.

......................
उद्यानाची पुनर्रचना
आनंदनगर जकात नाका ते नितीन कंपनी जंक्शन येथील कामांची पाहणी आयुक्तांनी केली. त्यातील जेथे अजून उद्यानाचे काम झालेले नाही तेथे स्थानिक, आकर्षक झाडे लावण्यात यावीत. त्याची पुनर्रचना केली जावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

..................................
सॅटीसच्या कामाचे नियोजन
ठाणे पूर्व येथील सॅटीस पुलाची आयुक्त बांगर यांनी दोन्ही दिशांनी पाहणी केली. कामाची सद्यस्थिती जाणून घेतल्यावर त्यांनी या कामाचे महिना-वार नियोजन सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुलाशेजारील नाल्यात साठलेला कचरा पाहून त्यांनी असमाधान व्यक्त केले.

.............................................
शौचालय स्वच्छता हा सर्व नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे किंवा अंमलबजावणीतील चुकांमुळे शौचालय अस्वच्छ असतील तर नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागतो. याबाबत कारवाई करण्याची वेळ न पाहता तत्परतेने दुरुस्ती होईल, याची दक्षता घ्यावी.
- अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका