मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे लवकरच काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे लवकरच काम सुरू
मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे लवकरच काम सुरू

मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवेचे लवकरच काम सुरू

sakal_logo
By

उरण, ता. १३ (वार्ताहर) : उरण मोरा ते मुंबई भाऊचा धक्कादरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांत बांधकाम सुरू होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर त्वरित या कामाला प्रारंभ होणार असून यासाठी साहित्य मोरा येथे नेण्यात आले आहे. यासाठी सरकारकडून ८८ कोटी ७२ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेले उरण आता रो-रो सेवेमुळे आणखी जवळ येणार आहे. नवीन मोरा जेट्टी सुरू झाल्यानंतर तिथून रो-रो सेवा सुरू होणार असून हे अंतर ३० मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना आपली वाहने थेट मुंबईला बोटीतून नेता येणार आहेत. त्यामुळे उरणकरांचा वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. मेरीटाईम बोर्ड आणि नौकानयन मंत्रालयाच्या सागरमाला योजनेतून हे काम करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशस्त मोरा जेट्टी, समुद्रातील गाळ काढणे, वाहनांसाठी पार्किंग, दिवाबत्ती यांसारखी कामे करण्यात येणार आहेत.

सध्या मोरा ते भाऊचा धक्कादरम्यान लाँच सेवा सुरू आहे. या प्रवासासाठी साधारण पाऊण तास वेळ लागतो. मोरा किंवा भाऊचा धक्का येथून खासगी वाहनाने किंवा बसने इच्छित स्थळी जाता येते. मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना आपली चारचाकी वाहने घेऊन थेट मुंबईत फिरता येईल. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा २०१७ मध्ये केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र त्यास मंजुरी मिळण्यास ऑगस्ट २०२१ उजाडले. त्यामुळे चार वर्षांनंतर अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पास विलंब झाला. सागरी महामंडळाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट अंतिम केले. जुलैमध्ये मोरा जेट्टीच्या कामासाठी डी. व्ही. पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्‍स प्रा. लिमिटेड कंपनीला कार्यादेश दिला आहे.


भारत सरकारच्या सागरमाला योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कार्यादेश दिल्यानंतर तत्काळ कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र पावसाळ्यात काम करता येत नसल्याने ऑक्टोबरमध्ये प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता १५ दिवसांत काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- सुधीर देवरे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ