घोडबंदर रोड-डहाणू महामार्गाची दुरुस्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडबंदर रोड-डहाणू महामार्गाची दुरुस्ती करा
घोडबंदर रोड-डहाणू महामार्गाची दुरुस्ती करा

घोडबंदर रोड-डहाणू महामार्गाची दुरुस्ती करा

sakal_logo
By

घोडबंदर रोड-डहाणू महामार्गाची दुरुस्ती करा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्राधिकरणाला सूचना

विरार, ता. १३ (बातमीदार) : घोडबंदर रोड ते डहाणूपर्यंतच्या महामार्गाची त्वरित दुरुस्ती करा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना दिल्या आहेत. घोडबंदर रोड, वसई ते डहाणूपर्यंत महामार्गाच्या झालेल्या दुर्दशेबाबत तसेच आयआरसीच्या नियमांप्रमाणे ठिकठिकाणी दिशादर्शक व सूचनाफलक नसल्याबाबत ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांनी आठ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत.
मागील काही महिन्यांत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर रोड ते डहाणूपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने सतत वाहतूक कोंडी होत असते. या सगळ्याचा प्रवाशांना मानसिक व शारीरिक त्रास होतो. अनेक ठिकाणी महामार्गाच्या आजूबाजूला अनधिकृतरीत्या हॉटेल्स व कारखाने आपला कचरा महामार्गालगतच टाकत असल्याने महामार्गाला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे महामार्गालगत दिवसेंदिवस वायुप्रदूषण वाढत असल्याकडे चरण भट यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले होते.
या पत्राद्वारे योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी चरण भट यांनी केली होती.
त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कार्यालयाचे मुख्य सचिव संकेत बोंडवे यांनी या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यासाठी हे पत्र १५ सप्टेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना वर्ग केले होते. तेथून या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी ठाण्याचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत खोडसकर यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. खोडसकर यांनी २० सप्टेंबर रोजी ई-मेलद्वारे मुंबई व ठाणे विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करत वेळीच योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
…………..
...तर जनहित याचिका दाखल करणार
आपल्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. मात्र संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जी केल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चरण भट यांनी सांगितले.