अंधेरीतील उमेदवारी संशयकल्लोळला उद्धव ठाकरे जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीतील उमेदवारी संशयकल्लोळला उद्धव ठाकरे जबाबदार
अंधेरीतील उमेदवारी संशयकल्लोळला उद्धव ठाकरे जबाबदार

अंधेरीतील उमेदवारी संशयकल्लोळला उद्धव ठाकरे जबाबदार

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव गट) उमेदवारीवरून झालेल्या गोंधळास खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. अन्य कोणाला उमेदवारी देण्यासाठी हा गोंधळ घातला का याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा हल्ला भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना सेनेतर्फे उमेदवारी देण्याची चर्चा आहे; मात्र त्यांच्या महापालिका सेवेतील राजीनाम्याचा गोंधळ सुरू आहे. यावरून उद्धव गटाने शिंदे-फडणवीस प्रशासनाला व महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना लाड यांनी वरील टीका केली आहे.
प्रत्येक वेळेला काहीही घडल्यावर भाजपवर किंवा फडणवीस-शिंदे सरकारवर आरोप करणे उद्धव यांनी बंद करावे. मुळात ऋतुजा लटके यांना उशिरा तिकीट जाहीर करणे हे शिवसेनेचे कटकारस्थान आहे. यातूनच तेथील उमेदवारीवरून नेतृत्वात असलेले मतभेद समोर येत आहेत, असेही लाड यांनी सुनावले आहे.
ऋतुजा लटके यांना मुद्दाम उशिरा उमेदवारी जाहीर करून राजीनामाही उशिरा देणे भाग पडले. तसेच दोन वेगवेगळे राजीनामे देणे भाग पडले. २५ वर्षे पालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला महापालिकेच्या सेवा-शर्ती काय आहेत ते आम्ही सांगण्याची गरज नव्हती. तरीही हा गोंधळ घालण्यामागे कोणाचा हात होता या प्रश्नांची उत्तरेही ठाकरे यांनी द्यावीत, असेही आव्हान लाड यांनी केले आहे.
दरवेळी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना डावलून अर्थपूर्ण चर्चा करून भलत्याला तिकीट द्यायचे हे वेळोवेळी शिवसेनेत होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीतही हा गोंधळ झाला आहे. या उमेदवारीबाबत शिवसैनिकांची आणि जनतेची दिशाभूल करणे ठाकरे यांनी बंद करावे. हे कोणाचे षड्‍यंत्र होते हे त्यांनी जाहीर करावे, असेही लाड यांनी सुनावले आहे.