शहापुरात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार शिगेला
शहापुरात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार शिगेला

शहापुरात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार शिगेला

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत निवडणुकीकरिता १६ ऑक्टोबरला मतदान होत असून, प्रचाराची शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सांगता होणार असल्याने, गावांच्या चौकाचौकात कॉर्नर सभा होणार असून त्यात एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येतील. त्यामुळे मतदारांचे मनोरंजन होणार आहे. परंतु, मतदारांना गावच्या विकासासाठी उमेदवार व पॅनलप्रमुख कोणते नवीन आश्वासने देतात याकडे लक्ष असणार आहे. सर्वच उमेदवार दारोदारी जाऊन मत मागत असून आश्वासनांची खैरात करत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी पॅनल प्रमुखांच्या हेकेखोरपणामुळे बिनविरोध न होता निवडणुका होत आहेत. एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार सलोख्याने प्रचार करीत असल्याने सर्वत्र शांततेचे वातावरण दिसत आहेत.
तालुक्यातील खर्डी हे निवडणुकीसाठी अतिसंवेदनशील असून याठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकडीचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहाटेच्या प्रहरी येणाऱ्या वासुदेवामार्फत प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वासुदेवामार्फत केलेली विकासकामे, भविष्यात करण्यात येणारे विकासकामे, मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करणे आदी विषयावरील गाणे बोलत नाट्य ठिकठिकाणी करण्यात येत असल्याने मतदारांचे मनोरंजन होत आहे.
-----------------------------------------------------------------
१४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्‍यानंतर कोणतेही वाद-विवाद होणार नाहीत व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी अन्यथा तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.
-राजकुमार उपासे,पोलिस निरीक्षक, शहापूर.