घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरवर वर्षभरात ४० अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरवर वर्षभरात ४० अपघात
घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरवर वर्षभरात ४० अपघात

घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरवर वर्षभरात ४० अपघात

sakal_logo
By

उड्डाण पुलावर सिमेंट ब्लॉकचा अडथळा
घाटकोपर-मानखुर्ददरम्यान वर्षभरात ४० अपघात

मुंबई, ता. १३ : घाटकोपर-मानखुर्द उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच ठेवण्यात आलेले सिमेंट ब्लॉकचे दुभाजक वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरत आहेत. सिमेंट ब्लॉक जीवघेणे असल्याच्या तक्रारी मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाढू लागल्या असून ते तात्काळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट हिनेही एक ट्विट करून सिमेंट ब्लॉकच्या अडथळ्याबाबत तक्रार केली आहे. सायरस मिस्त्रींच्या अपघातासारख्या एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे सांगत तिने मुंबई वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधले आहे.

स्थानिक रहिवासी संघटनांनीही पुलावरील धोक्याबाबत पालिकेकडे पाठपुरावा केला आहे; पण प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप होत आहे. उद्‍घाटनापासून आतापर्यंत जवळपास ४० अपघात घडलेला घाटकोपर-मानखुर्द उड्डाण पूल वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरत आहे.

१ ऑगस्ट २०२१ रोजी घाटकोपर-मानखुर्द उड्डाण पुलाचे उद्‍घाटन झाले. मात्र, रस्त्याचे सपाटीकरण व्यवस्थित न झाल्याने बाईकस्वार घसरण्याचे प्रकार घडले होते. वर्षभराच्या कालावधीत उड्डाण पुलावर तब्बल चाळीसहून अधिक अपघात घडले; परंतु अनेक बाबी पालिकेच्या निदर्शनास आणून देऊनही कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे गोवंडीतील स्थानिकांचे म्हणणे आहे. गतिरोधकही उखडले आहेत. उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच असलेले फायबरचे गतिरोधकही तुटून पडले आहेत. त्यासोबतच सिमेंटचे ब्लॉकही वाहनचालकांसाठी अडथळ्याचे ठरत आहेत. अनेकदा अंदाज न आल्याने मोठ्या अपघाताला धोका असल्याच्या तक्रारीही वाहनचालक करत आहेत.

ट्विटमध्ये पूजा भट म्हणते...
१. घाटकोपर-मानखुर्द उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच अतिशय निष्काळजीपणे सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते हटवणे अतिशय गरजेचे आहे.
२. अशा चुकांमुळे उड्डाण पूल वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी ब्लॉक हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
३. रात्रीच्या अंधारात सिमेंटचे ब्लॉक अतिशय जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळेच लेनची विभागणी करण्यासाठी सुरक्षित अशी उपाययोजना करा.

अवजड वाहनांना मनाई
वर्ष उलटूनही पुलावर अवजड वाहनांना प्रवेश देण्यात आलेला नाही, असा आरोप गोवंडी न्यू संगम नगर वेल्फेअर सोसायटीतर्फे करण्यात आला. दोन महिन्यांतच पुलावर अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, विजेच्या पारेषण वाहिन्यांच्या मनोऱ्याच्या उंचीच्या अडथळ्यामुळेच अवजड वाहने उड्डाण पुलावर नेण्यास मनाई आहे.