कितीही गुन्हे दाखल झाली तरी ठाम राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कितीही गुन्हे दाखल झाली तरी ठाम राहणार
कितीही गुन्हे दाखल झाली तरी ठाम राहणार

कितीही गुन्हे दाखल झाली तरी ठाम राहणार

sakal_logo
By

वाशी, ता. १३ (बातमीदार) : मेवा तिथं थवा अशी शिंदे गटाची परिस्थिती असून आपण कोणत्याही प्रलोभनाला आणि दहशतीला बळी पडणार नाही. आता राज्यात चला हवा येऊ द्या असा प्रयोग सुरू झाला आहे. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आपण आपल्या मतावर ठाम असून आपला लढा सुरू राहील, असे उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. आज नवी मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा जाहीर मेळावा भावे नाट्यगृहात पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली.

मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी महा प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शिवसेना नवी मुंबईप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपचा भारतीय संविधानाची चौकट पुसण्याचा डाव आहे. पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. महाप्रबोधन यात्रेतून महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे. सध्या सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र चेपला जातोय. भाजपला विरोधी पक्ष संपवायचा असून देशाला हुकूमशाहीकडे न्यायचे आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. या वेळी खासदार अरविंद सावंत यांनीदेखील धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घ्यायची या गद्दारांची लायकी नाही. त्यांना पद मिळेल; पण प्रतिष्ठा मिळणार नाही असे सुनावले. शिंदे गटाचे केसरकर हे नवे बोलके पोपट आहेत. पक्ष बदलणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये, असा केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला; तर २०१४ पासून शिवसेनेच्या आमदारकीच्या जागा कमी करून शिवसेना संपवण्याचा डाव भाजपने सुरू केला होता. भरसभेत राजीनामा देणारे आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, असा एकनाथ शिंदे यांच्यावर सावंत यांनी आरोप केला.

शिंदे यांना खुले आवाहन
राज्यातील राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठाण्यात होते. काही दिवसांपूर्वी ठाण्यात भरगच्च गर्दीत झालेल्या महाप्रबोधन यात्रेचा गद्दारांनी धसका घेतला आहे. त्यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. पाठीत वार करण्यापेक्षा समोर येऊन लढा, असे थेट आव्हान खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला केले आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा का दाखल नाही
ठाण्यामध्ये झालेल्या महाप्रबोधन यात्रेनंतर अंधारे यांच्यावर शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर बोलताना अंधारे यांनी माझ्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात असून भरसभेत विरोधकांवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीला केला आहे.