डोळ्यांच्या व्हायरल संसर्गात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोळ्यांच्या व्हायरल संसर्गात वाढ
डोळ्यांच्या व्हायरल संसर्गात वाढ

डोळ्यांच्या व्हायरल संसर्गात वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून हा एक व्हायरल संसर्ग असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांचा दाह जाणवत असून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे हा संसर्ग जास्त होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मुंबईतील केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांतील डोळ्यांच्या ओपीडीत दररोज डोळ्यांचा दाह होऊन लाल होण्याच्या समस्येने ग्रस्त असणारे किमान १० ते १५ रुग्ण दाखल होत आहेत. हा आजार प्राथमिक पातळीवर गंभीर जाणवत नसला तरी सातत्याने डोळे चोळल्यामुळले डोळ्यांमधील बुबुळांना जखमा होण्याच्या गंभीर घटना घडल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
या समस्येवर नागरिक वैद्यकीय मदत घेण्याऐवजी केमिस्टमधील औषध वापरतात. त्यातून उपचारांमध्ये अडथळे येतात. गर्दीची ठिकाणे, वारंवार हात न धुणे, स्वच्छता न राखणे, डोळ्यांचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तसेच औषधे थेट जाऊन विकत घ्यायची नाहीत. शिवाय, स्वतःची औषधे दुसऱ्यांना देऊ नयेत, असेही आवाहन त्‍यांनी केले आहे. दरम्‍यान, डोळे आलेल्यांच्या डोळ्यात बघितल्यानंतर डोळ्यांचा संसर्ग होत नाही, असे केईएम रुग्णालयाचे नेत्ररोगतज्ज्ञ आणि प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अविनाश इंगोले यांनी सांगितले. यासह वेगवेगळ्या व्हायरसमुळे डोळ्यांना ॲलर्जी होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते असे डॉ. इंगोले यांनी सांगितले.

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका-
पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडत नसतो, तेव्हा काही ठिकाणी चक्क उकाडा असतो. हवेतील दमटपणाही या ऋतूत वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसे, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दरवर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. या आजाराला ‘कंजक्टिव्हायटिस’ असे म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स अशा वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

लक्षणे काय-
डोळे लाल होणे,
डोळ्यांना सूज येणे, डोळे दुखणे
डोळ्यांतून पाणी आणि एक विशिष्ट द्रव बाहेर पडणे
ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात.
संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात.
डोळ्यांतून पाणी येऊन किंवा ‘पस’सदृश घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतातही.
काही वेळा डोळ्यांना खाज येते, डोळे जड वाटतात. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही.

लहान मुलांमध्येही संसर्ग-
लहान मुलांमध्येही डोळ्यांचा संसर्ग पसरला आहे. यासाठी नेत्ररोगतज्ज्ज्ञांना बरेचसे कॉल्सही येत आहेत, पण त्यांच्यावरील उपचार सारखेच असतात. डोळ्यात घालण्यासाठी दिलेले ड्रॉप्स वेगळे असतात, पण लहान मुलांनी डोळे चोळू नये यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.