शेतीसोबतच वीटभट्टी व्यवसायही धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीसोबतच वीटभट्टी व्यवसायही धोक्यात
शेतीसोबतच वीटभट्टी व्यवसायही धोक्यात

शेतीसोबतच वीटभट्टी व्यवसायही धोक्यात

sakal_logo
By

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय दिवाळीपूर्वी वीटभट्टीवर मजुरीचे काम करून चार पैसे जमवून दिवाळसण साजरा करण्याचा उद्देश ठेवणाऱ्या मजुरांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय लांबला आहे. त्यामुळे येथील मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत. पावसामुळे शेतातील धान्याचेही नुकसान होत आहे व वीटभट्टीवरची मजुरीही बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी-मजूर संकटात सापडला आहे.
तालुक्यात काही दिवसांपासून एकीकडे परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होईल की काय, या चिंतेत शेती व्यावसायिक आहेत; तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे वीट व्यवसाय लांबणीवर पडत असल्याने वीट व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे मजुरांचेदेखील मोठे नुकसान झाले असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज विजांच्या कडकडाटासह एक-दोन तास पाऊस कोसळत आहे. कापणी केलेल्या हळव्या वाणातील भातपिकांचे नुकसान होत आहे. पावसामुळे हळव्या वाणातील काही भातपिकांची कापणी करता येऊ शकत नाही. त्यामुळे ती कापणी हंगामातूनच निघून चालली आहेत. भाताच्या लोंब्या शेतातच गळून जात आहेत.
साधारणतः वीट उत्पादक दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात; मात्र आता दिवाळी अगदी मोजक्या दिवसांवर आली आहे तरीही पाऊस जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा पाऊस असाच सलग आठ दिवस सुरू राहिला तर दिवाळीच्या मुहूर्तावर वीट व्यवसाय सुरू करता येणार नाही. वीट व्यावसायिकांना याचीच चिंता सतावत आहे.

वीट व्यवसायाला मोठ्या संख्येने मजुरांची गरज लागते. दिवाळीत या मजुरांना पैशांची गरज असते. व्यवसायच सुरू झाला नाही, तर या मजुरांना पैसे कुठून देणार?
- सोनुशेठ खुताडे, वीट व्यावसायिक, जव्हार