मराठमोळ्या इतिहासाला चिमुकल्यांकडून उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठमोळ्या इतिहासाला चिमुकल्यांकडून उजाळा
मराठमोळ्या इतिहासाला चिमुकल्यांकडून उजाळा

मराठमोळ्या इतिहासाला चिमुकल्यांकडून उजाळा

sakal_logo
By

शिल्पा नरवडे ः जुईनगर
दिवाळी सणाची लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आतुरता लागलेली असते. नवीन कपडे, फटाके, दिवाळीतील फराळासोबत बच्चेकंपनीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो, तो ऐतिहासिक किल्ले तयार करण्याचा. जुईनगर विभागातील विविध सोसायट्यांमधील लहान मुले सध्या किल्ले बनवण्यात मग्न असून मराठमोळ्या इतिहासातील पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले हुबेहूब साकारण्याकडे अनेकांचा कल आहे.
-----------------------------------------------
काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा उत्साह आता जाणवू लागला आहे. जुईनगर विभागातील विविध सोसायट्यांमध्ये लहान मुले किल्ले बनविण्यासाठी सरसावली आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये कोणाचा किल्ला हुबेहूब होणार हीच चर्चा रंगली असून यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यापर्यंतची तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे किल्ले बनवण्यासाठी तरुण मंडळींसोबत पालकांचे देखील प्रोत्साहन मिळत आहे. गावाकडे किल्ला बनविण्यासाठी साहित्य सहज जमा करता येते, पण शहरामध्ये साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे बदलत्या काळानुसार बाजारातील रेडिमेड किल्ले देखील उपलब्ध आहेत. मात्र, अजूनही मुलांमध्ये रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष बनवलेले किल्ले बनवण्याकडे अधिक कल असून शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, सिंहगड, जंजिरा असे विविध किल्ले साकारण्यासाठी बाल मावळ्यांची लगबग सुरू झालेली आहे.
-------------------------------------------------
असे केले जाते नियोजन
दिवाळीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये लहान आकाराचा तरी किल्ला पाहायला मिळतो. मातीपासून किल्ला बनविण्याची मज्जा काही वेगळीच आहे. मातीचा किल्ला आणि दिवाळी हे घट्ट नाते असून दगड-माती, विटांनी साकारलेल्या किल्ल्यांची सुबक प्रतिकृती पाहायला मिळते. यासाठी माती गोळा करणे, किल्ल्यावर पहारा देण्यासाठीचे चिनी मातीपासून बनवलेले मावळे, तसेच दगड, विटा असे साहित्य गोळा करण्यात बच्चेकंपनी मग्न आहे.
-------------------------------------------------
किल्ल्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांची स्वच्छता ठेवण्यापासून जतन करण्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- आयुष गाडगे, तिरंगा सोसायटी