वसई-विरारमध्ये वीज चोरांनाच ‘शॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमध्ये वीज चोरांनाच ‘शॉक’
वसई-विरारमध्ये वीज चोरांनाच ‘शॉक’

वसई-विरारमध्ये वीज चोरांनाच ‘शॉक’

sakal_logo
By

वसई, ता. १५ (बातमीदार) : वसई-विरार शहरात वीजचोरांनी धुमाकूळ घातला असून विविध ठिकाणी शक्कल लढवत वीजचोरी केली जात आहे. याविरोधात कारवाई करत गेल्या आठवडाभरात महावितरण विभागाने धाडी टाकत एकूण १०३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
वसई-विरार विभागात संतोष भुवन, गावराई पाडा, वालईपाडा, मोरेगाव, नगिनदास पाडा, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिलनगर, भोयदा पाडा, नवजीवन, सातिवली, वालीव, जुचंद्र, टाकी पाडा, धानीव बाग, पेल्हार, शांतीनगर, गांगडे पाडा, नालासोपारा पूर्व आदी भागात वीजचोरीचा सुळसुळाट आहे. यात गोपचरपाडा येथे दोन इमारतीत ४८ जणांनी गेल्या ९ महिन्यात ४ लाख १५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे धाड टाकल्यावर समोर आले आहे. त्यामुळे सहाय्यक अभियंता अमेय रेडकर यांच्या फिर्यादीवरून सर्व जणांविरुद्ध विरार पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
वसई पूर्वेकडील वालीव भागात ५३ ठिकाणी नऊ लाख ६० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आल्यानंतर सहायक अभियंता सचिन येरगुडे यांनी नालासोपारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
याचबरोबर नालासोपारा पूर्वेत दोन जणांनी सहा लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले त्यामुळे सहायक अभियंता विनय सिंह यांनी दोघांविरुद्ध तुळिंज पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली.
--------------
अशी लढवली शक्कल
वीजचोरी करणारे विविध प्रकारे शक्कल लढवत वीजचोरी करतात; मात्र यामुळे अधिकृत वीजजोडणीधारकांना फटका बसत असतो. अधिक भर आल्याने वीज जाणे, रोहित्र, जनित्रात बिघाड होत असतात. या वीजचोरांना वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून विजेचा वापर केला असल्याचे समोर आले. तसेच वीज मीटर न लावता परस्पर वीज घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे महावितरण विभागाने अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरोधात तीव्रपणे मोहीम राबवली असल्याने पर्दाफाश होत आहे.
--------------
तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद
वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करण्याचे आवाहन महावितरण विभागाने केले आहे.
---------------
वसई : महावितरण विभागाने वीजचोरीतील जमा केलेले साहित्य.