टायपोग्राफीतून हिंदी व अरबी भाषेचा मिलाफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टायपोग्राफीतून हिंदी व अरबी भाषेचा मिलाफ
टायपोग्राफीतून हिंदी व अरबी भाषेचा मिलाफ

टायपोग्राफीतून हिंदी व अरबी भाषेचा मिलाफ

sakal_logo
By

प्रकाश लिमये : भाईंदर
टायपोग्राफी हा चित्रकलेचाच एक प्रकार. शब्दांच्या माध्यमातून भावना व अर्थ पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे टायपोग्राफी. या टायपोग्राफीचा अत्यंत कलात्मक पद्धतीने वापर करून हिंदी व अरबी भाषेचा सुंदर मिलाफ साधला आहे भाईंदरच्या सिराजुद्दीन शेख या चित्रकाराने. अजमेर शरीफ दर्गा याठिकाणी नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुफी रंग महोत्सवात त्यांची ही कला सर्वांच्याच पसंतीस उतरली.

कुराण व इस्लाम या विषयावर अजमेर शरीफ दर्गा येथील चिश्ती फाऊंडेशनकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय सुफी रंग महोत्सव या कॅलिग्राफी प्रदर्शानाचे आयोजन केले जाते. भाईंदरच्या सिराजुद्दीन शेख यांना पहिल्यांदाच या महोत्सवात कला सादर करण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. सिराजुद्दीन शेख यांनी जे. जे. कला महाविद्यालयातून चित्रकलेचे शिक्षण घेतले. कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या सिराजुद्दीन यांचा कॅलिग्राफीचाच प्रकार टायपोग्राफी हा अत्यंत आवडता विषय. टायपोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. ‘टायपोग्राफी विथ सिराज शेख’ हे फेसबुक पेजही त्यांनी सुरू केले आहे. या फेसबुक पेजवर शेख यांनी अल्लाची नव्व्याणव नावे हिंदी व अरबी या दोन्ही भाषांचा मिलाफ करून टायपोग्राफीत रंगवली आहेत. त्यांची फेसबुकवरील ही कला पाहूनच त्यांना अजमेरच्या सुफी रंग महोत्सवात आमंत्रित करण्यात आले.

हिंदू मुस्लिम संस्कृतीचे दर्शन
अरबी भाषा सर्वांनाच समजते असे नाही. त्यामुळेच अरबी भाषेतील कुराण व इस्लामचा अर्थ अरबी भाषेसोबतच हिंदी भाषेत एकत्रितपणे टायपोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी लोकांपुढे सादर केला. इस्लामचे पाच स्तंभ, अल्ला, महम्मद आदी कला त्यांनी त्याठिकाणी सादर केल्या. अशाप्रकारे चित्रकलेमध्ये हिंदी व अरबी भाषेचा एकत्रितपणे वापर याआधी कधीही झालेला नाही. त्यामुळेच अजमेरच्या महोत्सवातील टायपोग्राफीचे हे वेगळे सादरीकरण सर्वांच्याच पसंतीस उतरले होते. त्यांच्या या सादरीकरणाला गंगा-जमुना संस्कृती असेही नाव देण्यात आले. या कलेतून जणूकाही हिंदू-मुस्लिम संस्कृतीचे दर्शनच घडविण्यात आले, असे लोकांचे म्हणणे होते.

प्रदर्शनात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे, तसेच विदेशातील चित्रकारही या प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रदर्शनाला सर्वधर्मीय लोक भेट देत असतात. कलेच्या माध्यमातून इस्लामबद्दल निर्माण झालेले गैरसमज लोकांना समजतील अशा अगदी सोप्या भाषेतून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांना भावले.
- सिराजुद्दीन शेख, चित्रकार