बेघर नागरिकांनी अनुभवले सुखाचे क्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघर नागरिकांनी अनुभवले सुखाचे क्षण
बेघर नागरिकांनी अनुभवले सुखाचे क्षण

बेघर नागरिकांनी अनुभवले सुखाचे क्षण

sakal_logo
By

प्रसाद जोशी : वसई
छत नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नाही. सणासुदीचा थांगपत्ताच कळेना. त्यातच ऊन, थंडी, पाऊस, वारा झेलत आभाळाकडे आशाळभूत नजरेने पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. अशातच वसई-विरार महापालिकेने बेघरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आणि त्यांना सुखाचे क्षण अनुभवता आले.
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी बेघरांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची संकल्पना राबवली. माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी नेहमीच अशा बेघरांसाठी मदतीचा हात पुढे केला असल्याने त्याही हिरीरीने सहभागी झाल्या. महापालिकेने शहरातील रेल्वे परिसर, बस आगार परिसर, सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या बेघरांना आसरा मिळावा म्हणून निवारा केंद्र उभारले आहेत. त्याठिकाणी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. तसेच छताशिवाय राहणाऱ्या नागरिकांची विविध परिसरात जाऊन भेट घेत हितगुज साधून त्यांना आसरा दिला. वसई पूर्वेकडील वालीव येथे बेलची पाडा, तसेच नालासोपारा पूर्वेकडील वालई पाडा येथे असलेले बेघर निवारा केंद्र याठिकाणी भेट दिली. येथील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले.
महापालिकेमार्फत बेघर नागरिकांना सेवा देण्याचे काम नियमितपणे पार पाडले जात असून दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, उपायुक्त किशोर गवस, नियंत्रक सुकदेव दरवेशी आदींनी विविध उपक्रम राबवले. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्यासाठी कुटुंब, नातेवाईक व मित्र झाले आणि हळूवारपणे मायेची ऊब दिल्याने बेघर नागरिक भारावून गेले.
--------------------------------
राबवलेले उपक्रम
बेघरांचे सर्वेक्षण, बेघरांसाठी आधार कार्ड शिबिर, आरोग्याची तपासणी, शालेय विद्यार्थी चित्रकला व निबंध स्पर्धा, जाणीव-जागृती शासकीय विभागांशी कृती संगम, निवारा निर्जंतुकीकरण व सजावट आदी उपक्रम राबविण्यात आले.
----------------------------
महापालिकेच्या सुविधा
बेघर निवारा केंद्रांवर टूथब्रश, टूथपेस्ट, डस्टिंग पावडर, आंघोळ व कपड्यांचे साबण समावेश असलेल्या बॉक्सची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
----------------------
वसई : बेघर नागरिकांची विचारपूस करताना पालिका अधिकारी, कर्मचारी.