१७ लाखांचा युरियाचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१७ लाखांचा युरियाचा साठा जप्त
१७ लाखांचा युरियाचा साठा जप्त

१७ लाखांचा युरियाचा साठा जप्त

sakal_logo
By

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : शेतकऱ्यांसाठी अनुदान किमतीत शासन खत उपलब्ध करून देत असते, परंतु या खतावर डल्ला मारून तो व्यापारी उपयोगासाठी वापरात आणून जास्त किमतीने नफा कमावणाऱ्या माफियांवर नारपोली पोलिसांनी कारवाई करीत १७ लाख रुपयांचा निमकोटेड युरियाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पूर्णा येथील महालक्ष्मी वेअरहाऊसच्या गोदामामध्ये निमकोटेड यूरियाची साठवणूक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, अशी माहिती नारपोली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांच्या पथकाने गोदामावर छापा टाकला. या गोदामात साठवलेला आणि गोदामाबाहेर उभ्या असलेल्या ट्रकमधून एकूण ५० किलो वजनाच्या १७८६ गोणी निमकोटेड व संशयित साठवणूक केलेल्या यूरियाचा १६ लाख ९६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी योग फार्मा कंपनी व इतर संशयितांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाणे येथे फसवणुकीसह खत नियंत्रण व अत्यावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील हे करीत आहेत.

शेतकऱ्यांचा खत साठा काळ्या बाजारात
-----------------------------
निमकोटेड यूरियाची साठवणुक पूर्णा येथील आडवळणाच्या जागेत असलेल्या गोदामात सुरू होती. त्यामुळे पोलिसांच्या अथवा कोणाच्या नजरेस हा काळ्या बाजारातील खत साठा लक्षात येत नव्हता. पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने पाळत ठेवून सापळा लावून निमकोटेड यूरियाची साठवणूक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे पोलिस तपासात समोर येतील, त्यानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपास अधिकारी चेतन पाटील यांनी व्यक्त केली आहे. कृषी सोसायटीमार्फत अथवा शासनमान्य कृषी सेवा केंद्रातून विक्रीसाठी अत्यल्प दरात खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. अशाच ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या हक्काचा खताचा साठा माफिया काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवत असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.