विशेष मुलांमधील व्यंगांवर एकाच छताखाली उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांमधील व्यंगांवर एकाच छताखाली उपचार
विशेष मुलांमधील व्यंगांवर एकाच छताखाली उपचार

विशेष मुलांमधील व्यंगांवर एकाच छताखाली उपचार

sakal_logo
By

विशेष मुलांमधील व्यंगांवर एकाच छताखाली उपचार
नागपाड्यात साकारतेय ‘अर्ली इंटरवेंशन सेंटर’

भाग्यश्री भुवड, मुंबई
 जन्माला आल्यानंतर मुलामध्ये एखादे व्यंग असल्यास पाल्यासह पालकांचाही गोंधळ सुरू होतो. उपचारासाठी प्रत्येक व्यंगानुसार त्या त्या संबंधित रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मुंबई महापालिकेतर्फे विशेष मुलांवरील उपचारांसाठी नागपाडा येथे सुरू होत असलेले अर्ली इंटरवेंशन सेंटर (त्वरित निदान केंद्र) त्यांना वरदान ठरू शकेल.
--
 जन्मतःच व्यंग असलेल्या मुलांवरील उपचार आणि पुनर्वसनाबाबत कोणतीच तरतूद नसल्याने महापालिकेने त्यांच्यासाठी अर्ली इंटरवेंशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपाडा येथे उभे राहत असलेले हे केंद्र त्यांना वरदान ठरू शकेल. पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अधिपत्याखाली ते साकारत असल्याचे केंद्राच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिनल शहा यांनी सांगितले. विशेष मुलांमधील कोणत्याही व्यंगावर एकाच छताखाली उपचार हे या केंद्राचे वैशिष्ट्य असेल, असेही त्या म्हणाल्या.

अर्ली इंटरवेंशन सेंटरची इमारत पाच मजली आहे. केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांतच ते सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या केंद्रात कोणतेही व्यंग असलेल्या मुलांवर उपचार, तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. अशा मुलांसाठी विशेष तरतुदी नसल्याचे ध्यानात घेऊन मुंबई महापालिकेने हे केंद्र उभारण्याचे योजले. अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे. केंद्र उभारणीची संपूर्ण जबाबदारी नायर रुग्णालयावर सोपवण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी या केंद्राचे प्रमुख आहेत.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा मुलांवर उपचार देण्यासाठी नियमानुसार १२ वर्षांपर्यंतचा निकष ठरवण्यात आला आहे. मात्र त्वरित निदान केंद्रात उपचार घेण्यासाठी मुलाचे वय १८ पर्यंत ठेवण्यात आले आहे. केंद्रात बाह्यरुग्ण तत्त्वावर उपचार करण्यात येणार असल्याने मुले आणि पालक सवडीनुसार येऊ शकतील. नोव्हेंबरमध्ये केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, ते सुरू होण्यासाठी अजून एक ते दोन महिने लागणार आहेत. केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस आहे, असे डॉ. हिनल शहा यांनी सांगितले.

अशी आहेत केंद्राची वैशिष्ट्ये
१. लहान मुलांमधील शस्त्रक्रिया, दंत, कान, नाक व घसा, ऑर्थोपेडिक, फिजिओ, डोळे इत्यादी कोणत्याही व्यंगावर केंद्राच्या एकाच छताखाली उपचार मिळणार आहेत. त्यामुळे पालकांना विविध व्यंगांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची गरज नाही.
२. पुनर्वसन केंद्र पालिकेचे असल्याने मोफत किंवा कमी किमतीत उपचार मिळणार आहेत. या केंद्रात विशेष प्रशिक्षण, रोबोटिक, टेलिमेडिसीन आणि एकत्र विश्लेषणात्मक उपचार पुनर्वसन सुरू करण्यात येणार आहे.
३. या केंद्रात शाळांकडून किंवा डॉक्टरांकडून सुचवण्यात आलेल्या व्यंग असलेल्या मुलांवर उपचार होणार आहेत. अॅनिमल, म्युझिक, योगासने इत्यादी विविध थेरपींचा उपचारांत समावेश आहे.