उत्तन जवळ समुद्रात मासेमारी नौकेला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तन जवळ समुद्रात मासेमारी नौकेला अपघात
उत्तन जवळ समुद्रात मासेमारी नौकेला अपघात

उत्तन जवळ समुद्रात मासेमारी नौकेला अपघात

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : उत्तनजवळील समुद्रात वाशी बेट ते गोडा बेट यादरम्यान असलेल्या खडकांवर आदळून मासेमारी नौकेचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. या वेळी याच भागातून जात असलेल्या अन्य मासेमारी नौका मदतीला धावून गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
उत्तनमधील राजेश फ्रान्सिस बेचरी यांची रॉक्सन नावाची मासेमारी नौका शुक्रवारी रात्री ८ वाजता मासेमारीसाठी निघाली होती. समुद्रात वाशी बेट ते गोडा बेटदरम्यान मोठ्या प्रमाणात खडक आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिशा दाखवणारे दीपस्तंभ नसल्याने व समुद्राला ओहोटी असल्याने पाण्याचा अंदाज चुकल्याने नौका खडकावर जाऊन आदळली. या धडकेत नौकेला खालच्या बाजूने तडा जाऊन नौकेत पाणी भरू लागले. नौका बुडणार याची जाणीव झाल्यामुळे नौकेवरील नाखवा व इतर खलाशी यांनी अन्य मासेमारी नौकांशी मोबाईलवरून संपर्क साधला व मदतीची मागणी केली. त्यामुळे मासेमारीसाठी जात असलेल्या अन्य दोन नौका मदतीला धावून गेल्या. या वेळी बुडत असलेल्या नौकेवरील सर्व खलाशी सुरक्षित आहेत याची खात्री पटवून सुपरस्टार व संत कार्लोस या दोन मासेमारी नौकांनी रॉक्सन नौकेला दोन्ही बाजूंनी दोरखंड बांधत खेचून समुद्रकिनारी आणले.