मनसेकडून यशस्‍वी आंदोलनांची बॅनरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेकडून यशस्‍वी आंदोलनांची बॅनरबाजी
मनसेकडून यशस्‍वी आंदोलनांची बॅनरबाजी

मनसेकडून यशस्‍वी आंदोलनांची बॅनरबाजी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेची निवडणूक मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मनसेची यशस्वी आंदोलने लोकांपर्यंत पोहचवा, असे आदेश जारी केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर घाटकोपर असल्फा येथे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली भव्य बॅनर लावून मनसेने केलेल्या आंदोलनाचा विरोधकांना दाखला देण्यात आला आहे.
असल्फा मेट्रो स्टेशनजवळ मनसेने भव्य बॅनर लावून त्यावर आजवर मनसेने केलेल्या आंदोलनांचा दाखला दिला आहे. तसेच मनसे अर्धवट आंदोलने सोडत नसते, असा संदेश देत विरोधकांना चिमटा काढला आहे. टोलमुक्त महाराष्ट्रपासून मोबाईलवर मराठी भाषेत संदेश, हिंदू सण तसेच मुंबईत रझा अकादमीने पोलिसांवर केलेला हल्ला व त्याला मनसेने दिलेले जशास तसे उत्तर, या गोष्‍टींचा दाखला मनसेने या बॅनरमधून दिला आहे. हिंदुत्वाचे खरे वारसदार आम्हीच, असे सांगणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावत मनसे अर्धवट आंदोलने सोडते असे म्हणतात, मग अडीच वर्षे राज्यात सत्ता उपभोगून मराठी व हिंदुत्वाचे कैवारी म्हणणाऱ्यांनी राज्यात किती टोल बंद केले, असा सवाल मनसेने केला आहे. या वेळी विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली, सचिव संजय मुळे, महिला विभाग अध्यक्ष संगीता लांडे, शाखा अध्यक्ष राहुल चव्हाण, रवींद्र मालुसरे, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी आम्हाला मनसे स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे कळवून मनसेने आजवर केलेली आंदोलने लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश दिला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही घरोघरी मनसेने केलेली आंदोलने पोहोचवणार आहोत. आज त्याची असल्फामधून सुरुवात केली आहे.
– महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष