Farmer : वाढत्या महागाईने शेती परवडेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer
वाढत्या महागाईने शेती परवडेना!

Farmer : वाढत्या महागाईने शेती परवडेना!

तळा : तालुक्यातील पारंपरिक भात, नागली, वरी, कुळीथ, तूर, उडीद ही पिके हळूहळू कालबाह्य होत आहेत. त्यातल्या त्यात भातपीक थोडी फार घेत आहेत. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष होत आहेत.

गेली तीन पिढ्या तळा भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात होती. ज्यांची शेती मोठी त्यांना मोठा मान मिळायचा. गायी, गुरे दुधदुभते यावर मोठी श्रीमंती मानली
जात होती. परंतु वाढत्या महागाईमुळे हळूहळू शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत गेले. पहिली, दुसरी पिढी ही खोत पद्धतीत गुरफटून गेली. त्यातच १९७२ च्या दुष्काळात अनेकांनी आपल्या पारंपरिक व्यवसायात लक्ष कमी केले. शेती हा आत्मा समजून दुसरी पिढी शेतीत नागली, वरी, तूर, उडीद अशी पिके घेत.

दुधदुभते घेऊन जीव धरून होते; परंतु हळूहळू महागाई वाढत जात शिगेला पोहचवली. त्यामुळे ही पिके या भागातून हळूहळू कालबाह्य होत आहेत. शेतकरी मुले-बाळांना घेऊन मुंबई, ठाणे, दिवा, नालासोपारा या भागात मिळेल ते काम करत आहेत. याचा परिणाम रानमळा आता उजाड होत आहे. पीकपाणी बुडत चालले आहे.

त्यातच आता गरजा आणि अपेक्षा वाढत चालल्याने पारंपरिक पद्धतीने शेती करूनही खर्च निघत नाही. शेतीत खर्च जास्त आणि नफा तर मिळतच नाही. शेतकऱ्यांना केवळ जगण्याची धडपड करावी लागत आहे. आता तालुक्यात भातपीक काही प्रमाणात घेतले जाते. मात्र, अनेकांची पावले हळूहळू शहराकडे वळत असल्याने पारंपरिक शेतीवर गंडांतर आले आहे.

पूर्वी आपल्या भागात भातशेतीबरोबरच नाचणी, वरी, तीळ, उडीद, कुळीथ ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असायची. कुटुंबाचा उदरनिर्वाह गावातच आपल्या जमिनीवर होत असे. मात्र, वाढती महागाई, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या किमतीत वाढ झाल्याने शेती न परवडणारी झाली आहे.
- विठोबा जाधव, शेतकरी, कर्नाळा फळशेत

मुंबईत राहणे ही फॅशन झाली आहे. मुलींना तर मुंबईत राहणारा नवरा पाहिजे. अशा प्रवृत्तीमुळे तरुण वर्ग मुंबईत राहू लागला आहे. मग पारंपरिक शेती ओस पडू लागली. वयोवृद्ध आहेत तोवर कशीबशी शेती चालत आहे. तरुण आता शेतात उतरणे कठीण होऊन बसले आहे.
- लक्ष्मण खांडेकर, ज्येष्ठ शेतकरी