एसटी डेपोमध्ये केडीएमटी, एनएमएमटीला नो एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी डेपोमध्ये केडीएमटी, एनएमएमटीला नो एन्ट्री
एसटी डेपोमध्ये केडीएमटी, एनएमएमटीला नो एन्ट्री

एसटी डेपोमध्ये केडीएमटी, एनएमएमटीला नो एन्ट्री

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : कल्याण एसटी डेपोमध्ये शनिवार (ता. १५) पासून एनएमएमटी आणि केडीएमटी बसेसना प्रवेश बंदी केल्याने सकाळच्या सत्रात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. बस रस्त्यावर उभ्या करून प्रवासी घेण्याची वेळ आल्याने काही काळ परिसरात चक्का जाम झाला होता. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्थानक परिसरात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीमधील कामाला वेग येत असल्याने एसटीच्या बसेसना जागा अपुरी पडत आहे. यासाठी कल्याण एसटी डेपोमध्ये येणाऱ्या केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बसेला १५ ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी पर्याय शोधावा, अशा सूचना सोमवारी (ता. १०) झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. १५ ऑक्टोबर उजाडला तरीही केडीएमटी आणि एनएमएमटीने पर्याय न शोधल्याने शनिवारी सकाळच्या सत्रात एकच खळबळ माजली.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याण एसटी डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी डेपो प्रवेशद्वारावर कर्मचारी वर्गाची नेमणूक करून एनएमएमटी आणि केडीएमटीच्या बसेस आत येण्यास बंदी घातली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर केडीएमटी आणि एनएमएमटीने रस्त्यावर बसेस उभ्या करत प्रवासी वाहतूक केल्याने दिवसभर स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आता एसटी प्रशासनाने बंदी घातल्याने तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. १८) दुपारी एक वाजता केडीएमसी आयुक्त यांच्या दालनात सर्व सरकारी अधिकारी वर्गाची बैठक होणार आहे.