भात कापणीसाठी मजुरांचा भाव वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात कापणीसाठी मजुरांचा भाव वधारला
भात कापणीसाठी मजुरांचा भाव वधारला

भात कापणीसाठी मजुरांचा भाव वधारला

sakal_logo
By

पेण, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा पेण तालुका आता पूर्णपणे नापीक होत आहे. खारेपाटातील अनेक भागांमधील भातशेती वाया गेली आहे, तर कित्येक शेतकऱ्यांनी भातशेती पडीक ठेवली आहे.
तालुक्यात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक शेतकरी अथवा शेतमजूर कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. परिणामी भात कापण्यासाठी मजुरांची कमतरता भासत असून त्यांचा भाव वधारला आहे.
रब्बी हंगामात घेतले जाणारे दुबार भातपीक, कडधान्य शेती, भाजीपाला लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मेहनत अधिक, त्‍या तुलनेत उत्‍पादन कमी मिळत असल्‍याने तरुण वर्ग शेतीऐवजी कंपन्यांमध्ये रोजगार शोधत आहेत. त्यामुळे हजारे एकर शेती पडीक झाली असून त्‍याचा फटका शेती उत्‍पादनाला बसतो आहे.
या पूर्वी भात शेती कापण्यासाठी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी समाजातील मजूर मोठ्या संख्येने मिळायचे, मात्र हाच कामगार आता तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये कंटात्री पद्धतीने काम करू लागला आहे; तर काही पनवेल, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त जात आहेत. तरुण वर्गाची नोकरीला अधिक पसंती मिळू लागल्‍याने तो शेती व्यवसायापासून दुरावत आहे‌. त्‍यामुळे परंपरागत शेती सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्याच घरातील मंडळींना घेऊन शेतावर काबाडकष्ट करावे लागतात.
भात कापणीसाठी ५०० ते ६०० रुपये मजुरी देऊनही शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातशेतीची कामे केली नाहीत तर कापणीला आलेल्या पिकाची नासाडी होण्याची परिणामी उत्‍पन्नावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने मजुरांची मनधरणी करून मागेल ती मजुरी, शिवाय नाश्‍ता, जेवणाची सोय, येण्या-जाण्याचा खर्च द्यावा लागतो.
हस्त नक्षत्र संपताच शेतकरी भात कापणीला व झोडणीला सुरुवात करतो, मात्र सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्‍याने कापणीला विलंब होत आहे. येत्या काही दिवसांत कापणीचा हंगाम
सुरू होणार असल्याने आतापासूनच शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत.
पेण शहरातील नगरपालिका नाक्यावर तालुक्यातील अनेक मजूर सकाळी सात वाजल्यापासून कामासाठी हजेरी लावतात. या मजुरांसाठी दोन वेळचे जेवण, योग्‍य मजुरी देऊनही मजूर शेतीच्या कामासाठी येत नाहीत. पेणमध्ये औद्योगिकदृष्ट्या अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. अनेक कामगार शहराजवळ बिल्‍डिंगच्या कामात व्यस्‍त असल्‍याने भात कापणीसाठी जास्त मजुरी देऊनही काम करण्यास तयार होत नसल्‍याचे चित्र तालुक्‍यात दिसते.

पेण तालुक्यातील अद्याप कापणीची कामे पूर्णतः सुरू झालेली नाहीत. दोन-चार दिवसांत सर्व शेतकरी कापणीला सुरुवात करतील. सध्या कापणीला मजूर मिळत नसल्याने फार पंचायत होत आहे. एकीकडे भात शेती करणे आता खूप महागात पडत असून मजुरांना ५०० ते ६०० रुपये देऊन सकाळी नाश्ता, दुपारी जेवण यासह त्यांना ने-आण करण्यासाठी गाडी भाडे द्यावे लागत असल्याने शेती न परवडण्यासारखी झाली आहे. बहुतांशी लोक नोकरदार असल्याने आता मजूर मिळणे कठीण झाले आहे.
- राजेंद्र पाटील, शेतकरी, पेण