दरवाढ मिळाली; मुजोरी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरवाढ मिळाली; मुजोरी कायम
दरवाढ मिळाली; मुजोरी कायम

दरवाढ मिळाली; मुजोरी कायम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : दिवाळी खरेदीसाठी सकाळ-संध्याकाळ प्रवासी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. अवजड सामानामुळे रिक्षाने प्रवास करण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. याचा फायदा रिक्षाचालक घेत असून जवळचे तसेच जादा भाडे न देणाऱ्या प्रवाशांना भाडे नाकारले जात असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. नियमांचा बडगा दाखवून जेवढ्या तत्परतेने वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो, तेवढा धाक मुजोर रिक्षाचालकांसाठी मात्र दिसत नाही. रिक्षाचालकांच्या या मनमानीकडे आरटीओ कधी लक्ष देणार, असा सवाल प्रवासी करत आहेत.
रिक्षाभाडे दरात दोन रुपयांची वाढ झाल्यानंतर रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने शेअर भाड्यात तीन रुपयांची वाढ केली आहे. सीएनजी दरात वाढ झाल्याचे सांगत काही रिक्षाचालकांनी आधीच पाच ते सहा रुपयांची दरवाढ केली आहे. परिवहनने किमान भाडे २३ रुपये केले त्यानुसार दोन रुपये जादा दराने भाडे आकारणी रिक्षाचालकांना बंधनकारक आहे. या नियमांची पायमल्ली रिक्षाचालकांकडून होत असून शेअर दरात वाढ झालेली नसतानाही चालकांनी सर्रास तीन रुपयांनी शेअर दरात वाढ केली आहे. ज्या थांब्यावरून पाच ते सहा रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्या चालकांनी इतर चालकांप्रमाणे दोन ते तीन रुपये कमी करणे आवश्यक असताना तेही चालकांनी केलेले नाहीत. शेअर दरात चालकांनी वाढ केलेली असताना चालकांकडून भाडेदेखील नाकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नोकरीनिमित्त तसेच दिवाळी आली असल्याने खरेदीसाठी प्रवासी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. हातात अवजड सामान असल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो; परंतु रिक्षाचालकांची ही दररोजची मनमानी आता प्रवाशांच्या उद्रेकाचे कारण बनत चालली आहे.

प्रवाशांनाच त्रास
काही दिवसांपूर्वीच डोंबिवली पश्चिमेत एका प्रवाशाने रिक्षाचालकाला १५ रुपये भाडे देण्यास नकार दिला. या वेळी रिक्षाचालकाने प्रवाशासोबत हुज्जत घातली असता, तेथे कर्तव्यावर असलेल्या एका आरटीओ कर्मचाऱ्याने प्रवाशालाच दरवाढ झालेली माहीत नाही का, असे सांगत झापले. यामध्ये रिक्षाचालक सहीसलामत वाढीव भाडे घेऊन सुटून गेला; तर प्रवाशाला मात्र पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. प्रवाशांनाच कायम धारेवर धरणाऱ्या आरटीओला रिक्षाचालकांची मनमानी कधी दिसणार, असा सवाल यानिमित्ताने प्रवासी उपस्थित करत आहेत.

लेखी तक्रार करा; तरच कारवाई
जादा भाडे, भाडे नाकारणे यांसारखी रिक्षाचालकांची मुजोरी सुरू असताना आरटीओ मात्र तक्रार क्रमांकावर लेखी सविस्तर तक्रार करा, असा सल्ला प्रवाशांनाच देत आहेत. गेल्या तीन महिन्यांत जादा भाड्याच्या ६५; तर भाडे नाकारण्याच्या केवळ ११ तक्रारी आरटीओकडे प्राप्त झाल्याचे प्रशासन सांगते. महिन्याभरात जादा भाड्याच्या १९; तर भाडे नाकारण्याच्या केवळ दोन तक्रारी आल्या आहेत. प्रवाशांनी तक्रार क्रमांकावर सविस्तर लेखी तक्रार केल्यास त्यावर निश्चित कारवाई होते, असे आरटीओ प्रशासन सांगते; परंतु अनेक प्रवासी तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगत आहेत.

येथे तक्रार करा
रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढायची असेल, तर आता प्रवाशांनाच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आरटीओने दिलेल्या ९४२३४४८८२४ या क्रमांकावर प्रवाशांनी जास्तीत जास्त तक्रारी करून आरटीओकडे त्या तक्रारींचा पाठपुरावा करावा, असे आवाहन जागरुक प्रवासी करत आहेत.