स्पर्धांमधील शुल्कवाढीचा खेळाडूंना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धांमधील शुल्कवाढीचा खेळाडूंना फटका
स्पर्धांमधील शुल्कवाढीचा खेळाडूंना फटका

स्पर्धांमधील शुल्कवाढीचा खेळाडूंना फटका

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : कोरोना महामारीनंतर शालेय क्रीडा स्पर्धांमधील खेळाडू शुल्क कमी करण्यात आले; तर काही ठिकाणी माफ केले जात असताना ठाणे विभागात विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंचे शुल्क वाढवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे गरीब व होतकरू खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे धोरण दिसत असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते; परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्याकडे महानगर परिसरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय या खेळाडूंचे वार्षिक शुल्क भरावे लागते. हे शुल्क मागील वर्षीपर्यंत कमी होते; मात्र यावर्षी शुल्क दुप्पट करण्यात आल्यामुळे शाळा मुख्याध्यापक, प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त ठाणे विभागात शुल्कवाढ केली असल्यामुळे शिक्षकांमध्ये याबाबत प्रचंड रोष असून विद्यार्थी, पालक, शाळांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या वाढलेल्या शुल्काविरोधात कल्याण डोंबिवलीतील क्रीडा शिक्षक एकत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे. तसेच कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

………………….
शुल्कवाढीमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अनेक शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार नाहीत. खेळाडू स्पर्धेच्या बाहेर जाणार असून यामुळे क्रीडा क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होणार आहे.
- लक्ष्मण इंगळे, अध्यक्ष, शारीरिक क्रीडा संघटना, कल्याण तालुका

……………………...
मुंबई विभागामध्ये फक्त ठाणे जिल्ह्यात शुल्क वाढवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्षे शुल्कवाढ झालेली नव्हती. शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पंच, परीक्षक व इतर खर्च वाढला असल्यामुळे या वर्षी थोडे शुल्क वाढवण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये ८० ते ९० टक्के शाळांनी शुल्क भरलेले आहे, त्यामुळे आता शुल्क कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी

………………...
शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमधील शुल्कवाढीच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यासंदर्भात मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना पत्र पाठवले आहे. वाढीव शुल्काबाबत विचारणा केली आहे. मला त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
- स्नेहा करपे, नोडल क्रीडा अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका