महिला रिक्षा प्रवासी असुरक्षितच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला रिक्षा प्रवासी असुरक्षितच
महिला रिक्षा प्रवासी असुरक्षितच

महिला रिक्षा प्रवासी असुरक्षितच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १६ : रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करत तिला फरपटत नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात ‘सातारा पॅटर्न’ राबवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व महत्त्‍वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढणार आहे, पण २०१४ पासून ते आतापर्यंतच्या घटना पाहता दरवेळी घोषित होणारे ‘प्लान’ काही काळानंतर रद्दीत जमा होत असल्याचाच अनुभव असून, त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढतच आहे.
ठाण्यात महिलांसाठी रिक्षा प्रवास असुरक्षितच असल्याचे आतापर्यंतच्या घटनांनी उघड झाले आहे. २०१४ साली स्वप्नाली लाड प्रकरणापासून ते आता महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंग प्रकरणावरून हे वारंवार स्पष्ट झाले आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी स्वप्नाली लाड ही रिक्षातून घरी जात असताना चालकाने केलेल्या असभ्य वर्तनामुळे तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. या घटनेनंतर ती २१ दिवस कोमात होती. या घटनेनंतर ठाण्यातील सीसी टीव्ही कॅमेराचे जाळे किती कुचकामी आहे, याचा प्रत्यय आला होता. या घटनेला सात महिने होत नाही तोच ३ मार्च २०१५ मध्ये रिक्षाचालकाच्या अश्लील हावभावाला घाबरून दोन मैत्रिणींनी धावत्या रिक्षातून कॅडबरी जंक्शन उड्डाण पुलावरून उडी घेतली. या दोन घटनांमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तत्कालीन वाहतूक पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी सर्व रिक्षांना स्मार्ट कार्ड लावण्याची मोहीम राबवली होती, पण तरीही या घटना काही थांबल्या नाहीत.
८ जून २०१७ मध्‍ये पुन्हा तशीच घटना घडली. रात्री साडेनऊच्या दरम्यान २३ वर्षीय तरुणीने मुलुंड चेकनाक्यावरून मानपाडा येथे घरी जाण्यासाठी शेअर रिक्षा केली. यावेळी चालकासह एक प्रवासीही त्याच्या सोबत होता. तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न या नराधमांनी केला, पण तिने आरडाओरड करताच तिला धावत्या रिक्षातून कापूरबावडी येथे ढकलून देण्यात आले होते. त्यानंतर कन्मिला रायसिंग हिलाही गेल्या वर्षीच अशाच घटनेला सामोरे जावे लागले, तर या वर्षी १४ ऑक्टोबरला ठाण्याच्या स्थानक मार्गावर महाविद्यालयीन तरुणीची छेड काढत रिक्षाचालकाने तिला फरपटत नेल्याची घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर तीन पथके बनवून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात नराधम रिक्षाचालकाला अटक केली आहे, पण तरीही महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही ऐरणीवरच आहे.

रिक्षाचालकांची मनमानी
ठाणे शहरात रिक्षाचालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढतच असल्याचा अनुभव ठाणेकरांना येत आहे. अगदी रेल्वेस्थानकाबाहेर पडताच रिक्षाचालकांचा गराडा, वाटमारी सुरू होते. जवळचे भाडे नाकारणे, मनमानी भाडे आकारणे आदी प्रकार तर दररोज घडत आहेत. मात्र त्या तुलनेत पोलिसी कारवाई मात्र नगण्‍यच असल्याचे दिसते.

स्मार्ट कार्ड बासनात
महिला रिक्षा प्रवाशांसोबत वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहतूक पोलिसांनी प्रत्येक रिक्षामध्ये स्मार्ट कार्ड बसवण्याची योजना आणली. रिक्षाचालकाच्या माहितीसह मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक या कार्डावर होता. त्यानुसार शेकडो रिक्षांमध्ये हे स्मार्ट कार्ड लावण्यातही आले. मात्र अल्प प्रतिसादामुळे ही योजना फसली.

‘सातारा पॅटर्न’ची नवी घोषणा
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेत ‘सातार पॅटर्न’ राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, खासगी क्लास परिसरात साध्या वेशातील महिला पोलिसांची नेमणूक करणे, बीट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत; पण ठाणे पोलिसांचे अपुरे बळ आणि सत्तांतरणानंतर शहर राजकीय आखाडा बनल्यामुळे संपूर्ण बंदोबस्त राजकारण्यांच्या मागेच धावत असल्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचे आणि महिला अत्याचाऱ्याच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.