दिवाळीच्या उत्साहावर विरजण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या उत्साहावर विरजण
दिवाळीच्या उत्साहावर विरजण

दिवाळीच्या उत्साहावर विरजण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः मध्य रेल्वेने पनवेल ते वाशी मार्गावर रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांचे हाल झाले. या वेळी पनवेलपासून नेरूळ-वाशीपर्यंतची सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, एसटी, एनएमएमटी आणि बेस्ट बसचा आधार घेत इच्छित स्थळी जाण्यासाठी कसरत करावी लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांची गर्दी झाली होती; तर काही ठिकाणी रिक्षाचालकांनी शेअर ऑटोच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची चांगलीच लूट केली.
धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरवात होत आहे. त्यानंतर २४ तारखेला नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे एका आठवड्यावर आलेल्या दिवाळीसाठी रविवारचा मुहूर्त साधत अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले होते. यानिमित्ताने नवी मुंबईतील वाशी, एपीएमसीजवळ ग्रोमा मार्केट, तुर्भे जनता मार्केट, नेरूळ जनता मार्केट येथे शहराबाहेरील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. शिवाय पुढच्या आठवड्यातील रविवारी खरेदी करता येणार नसल्याने घरातील मंडळींसोबत आजच अनेकांनी नियोजन केले होते. पण घराबाहेर पडणाऱ्या या नागरीकांना लोकलसेवा बंद असल्याचा चांगला फटका बसला आहे. पनवेल ते वाशी दरम्यानची सेवा पूर्णपणे ठप्प असल्यामुळे मिळेल त्या प्रवासी वाहनांमधून बाजारपेठा गाठण्याची धावपळ सुरू होती. त्यामुळे एसटी, एनएमएमटी आणि बेस्टच्या सर्वच थांब्यावर गर्दी झाली होती.
--------------------------------
कडाक्याच्या उन्हातच प्रतीक्षा
रविवार असल्याने एनएमएमटीतर्फे कमी बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी बस थांब्यावर प्रवाशांना तासन् तास बसची वाट पाहात बसावे लागले. सायन-पनवेल महामार्गावर वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर, खारघर या थांब्यांवर प्रवाशांची प्रंचड गर्दी होती. अशातच आज परतीच्या पावसानेही दडी मारल्यामुळे कडाक्याच्या उन्हातच बसची प्रतीक्षा करावी लागली.
-----------------------------
गैरसोयीत रिक्षाचालकांची चंगळ
लोकल सेवा बंद असल्यामुळे रेल्वे स्थानकांबाहेर गोळा झालेल्या प्रवाशांना रिक्षाचा आधार होता. मात्र जुईनगर, एपीएमसी, तुर्भे या मार्गावर धावणाऱ्या रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले गेले. बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी उन्हात ताटकळत उभे राहण्यापेक्षा रिक्षाने जाणे पसंत केले.
----------------------------
पुढच्याच आठवड्यात दिवाळी आल्यामुळे कुटुंबीयांसाठी खरेदी करायला बाहेर आलो; परंतु आज रेल्वे बंद असल्यामुळे प्रवास करताना खूप त्रास झाला. एपीएमसीला जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. शेवटी तासभर वाट पाहिल्यानंतर नेरूळ येथून एपीएमसी मार्केटला जाणारी बस मिळाली. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर तरी रेल्वेने मेगाब्लॉक घ्यायला नको होता.
- सचिन वडवलकर, सीवूड्स