उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

sakal_logo
By

वसई, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी (ता. १६ ) पार पडले. काही भागात तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. यावेळी मतदार राजाने मतदानाचा हक्क बजवला असून, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी मतमोजणीनंतर मतदाराने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.
पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे मतदार सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रासह परिसरात पोलिसांची नजर होती. जिल्ह्यातील १,२८३ पोलिंग बूथवर खबरदारी घेण्यात आली. वसई, विक्रमगड, डहाणू, पालघर, मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात आले. सकाळी मतदार कमी प्रमाणात केंद्रावर होते. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २७.३८ टक्के इतके मतदान झाले, तर दुपारी दीड वाजता ४५.७० टक्के इतके मतदान झाले. यात महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. यामुळे दुपारनंतर मतदानासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकदेखील मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहचले होते; तर नव्या मतदारांनी देखील आपला हक्क बजावला.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून प्रचाराला मोठा वेग आला होता. त्यानंतर मतदान पार पडल्यावर आता ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व असणार व कोणाचा पराभव होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले तरी मतमोजणी नंतर चित्र समोर येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानासाठी ईव्हीएम मशीनची जरी खातरजमा करण्यात आली असली तरी अनेक मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे मतदारांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.
----------------
पोलिसांचा बंदोबस्त
पोलिसांनी मतदान केंद्राचे शंभर मीटर परिसर, मतदान केंद्रावर बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी मतदान केंद्रावर कोणतीही घटना घडू नये परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पालघर ग्रामीण पोलिस अधीक्षक विभागाकडून एकूण १९८२ कर्मचारी ८२ अधिकारी व राज्य राखीव दल तुकड्या सज्ज होत्या. काही ठिकाणी तुरळक घटना पोलिसांनी नियंत्रणात आणल्या.
---
दुपारनंतर मतदार केंद्रावर रांगा
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी मतदान अधिक होईल, असे वाटत असताना टक्केवारी कमी होती. मात्र दुपारनंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
---
उमेदवारांची उत्सुकता शिगेला
मतदानाचा हक्क जरी बजावण्यात आला असला तरी उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळाला असेल त्याची उत्सुकता रविवारी पाहावयास मिळाली. त्यामुळे बंद मतपेटीत कोणाला पसंती मिळणार आहे हे सोमवारी (ता. १७ ) सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.