जिल्ह्यात ७२ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ७२ टक्के मतदान
जिल्ह्यात ७२ टक्के मतदान

जिल्ह्यात ७२ टक्के मतदान

sakal_logo
By

अलिबाग, ता. १६ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७२.०८ टक्के मतदान झाले. एकूण २२ हजार ५५९ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ११ हजार १३५ महिला व ११ हजार ४२३ पुरुष मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रातील कर्मचारी व रायगड पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्‍त होता.
जिल्ह्यातील ६१ मतदान केंद्रांवर मतदानाच्या आदल्या दिवशी शनिवारी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस कर्मचारी रवाना झाले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्‍या होत्‍या.
नवमतदारांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्‍ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडले होते. सकाळी साडेअकरापर्यंत ३९.८३ टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत ६४.७५ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ७२.८ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वेश्वीतील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे काही वेळ मतदान करण्याची प्रक्रिया थांबली होती. नवीन मशीन लावल्‍यावर मतदानास पुन्हा सुरुवात झाली. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवत असल्याने मतदारांची गर्दी कमी होती. मात्र सायंकाळी चारनंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढू लागली.
मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावाला बंदी असल्याने जिल्हा पोलिसांच्या मदतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील वेश्वी येथील संवेदनशील मतदान केंद्रात तीन पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच २९ कर्मचारी नेमण्यात आले होते.
मतदानादरम्‍यान कोणताही गैरप्रकार, तसेच कायदा व सुव्यस्था बिघडू नये म्हणून शीघ्र कृती दल, सशस्‍त्र पोलिस, तसेच गोपनीय शाखेतील पोलिस तैनात होते. काही मतदान केंद्र मुख्य रस्त्यालगत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून वाहन पार्किंग योग्य ठिकाणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

जिल्ह्यातील अलिबागमधील दोन, पनवेलमधील एक, कर्जतमधील एक, खालापूरमधील चार, माणगावमधील तीन, महाडमधील एक व पोलादपूरमधील चार या सात तालुक्यांतील १६ ग्रामपंचायतींमधील १३२ जागांसाठी ही लढत झाली. त्यात सरपंचपदाच्या १६ जागांसाठी ३६ उमेदवार व सदस्यपदाच्या ११६ जागांसाठी २४७ उमेदवारांचे भवितव्य रविवारी ईव्हीएम मशीनमध्ये बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३१ हजार २९७ मतदारांपैकी २२ हजार ५५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


दीड वाजेपर्यंत झालेले मतदान
तालुका - ग्रामपंचायत - मतदार - झालेले मतदान - टक्केवारी
अलिबाग - २ - ६,७५५ - ४,५४९ - ६७.४९
पनवेल - १ - १,०२८ - ९३१ - ९०.५६
कर्जत - १ - १,६५७ - १,२६५ - ७६.३४
खालापूर - ४ - १२,८५९ - ९,५५२ - ७४.२८
माणगाव - ३ - ३,६७२ - २,४६४ - ६७.१०
महाड - १ - २,७३८ - १,९६४ - ७१.७३
पोलादपूर - ४ - २,५८८ - १,८२४ - ७०.४८
---------------------------------------------------
एकूण - १६ - ३१, २९७ - २२, ५५९ - ७२.०८