‘ॲप’द्वारे करा बेस्ट आगारात पार्किंग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ॲप’द्वारे करा बेस्ट आगारात पार्किंग!
‘ॲप’द्वारे करा बेस्ट आगारात पार्किंग!

‘ॲप’द्वारे करा बेस्ट आगारात पार्किंग!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांना आता आपली दुचाकी वा चारचाकी वाहने सुरक्षित पार्क करण्यासाठी जागा शोधण्याची गरज भासणार नाही. त्यांना आता एका ॲपच्या माध्यमातून बेस्टच्या ५० पेक्षा जास्त आगार आणि स्थानकांमध्ये आपले वाहन पार्क करता येणार आहे. बेस्ट आणि पार्क प्लस कंपनीमध्ये त्याबाबत करार झाला असून गाड्यांच्या गर्दीत पार्किंग शोधणाऱ्या मुंबईकरांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पार्क प्लस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या ५० हून अधिक बेस्ट आगारांत व स्थानकांत पार्किंग उपलब्ध होणार आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी बेस्टचे बस डेपो आहेत. सकाळी ८ ते रात्री १० दरम्यान ते सहसा रिकामेच असतात. त्यामुळे कायदेशीर व सुरक्षित पार्किंगची जागा शोधणाऱ्या वाहनमालकांना त्यांचा वापर करता येईल. उपक्रमाचा पुढील तीन महिन्यांत व्यापक प्रमाणात विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेच्या मदतीने बेस्टच्या आगारात व स्थानकांत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता, पुढील सहा महिन्यांत पुणे व नागपूर शहरांमध्येही सामाईक पार्किंग सोल्युशन्स सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पार्क प्लस कंपनीतर्फे सांगण्यात आले.

‘पार्क प्लस’ ॲपवरून करा बुकिंग
बेस्ट आगारातील पार्किंगसाठी वाहनमालकांना ‘पार्क प्लस’ अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपवरून ते हव्या असलेल्या भागातील पार्किंगची जागा शोधू शकतात. ती जागा आरक्षित करू शकतात आणि त्यासाठी आधीच ऑनलाईन शुल्क भरू शकतात. तीन सोप्या स्टेपमध्ये पार्किंगबाबतची प्रक्रिया पूर्ण होते.

‘व्हॅले सेवे’चाही पर्याय
कुलाबा कॉजवे व दिंडोशीसारख्या बस डेपोंजवळील व्यग्र बाजारांमध्ये पार्क प्लस कंपनीतर्फे व्हॅले सेवा पुरवली जाते. त्यानुसार मुंबईकर कोणत्याही एका व्हॅले पॉईंटवर आपली चारचाकी वाहने सोपवू शकतात. पार्क प्लस अॅपमार्फतच परतही बोलवूही शकतात. सुरक्षिततेच्या बाबतीत सांगायचे, तर प्रत्यक्ष स्थळावरील सुरक्षा पथकांद्वारे बस डेपोंवर देखरेख ठेवली जाईल. अॅपमार्फत बुकिंग तपशिलांची पडताळणी झाल्यावरच प्रवेश मंजूर केला जाईल.

पार्किंगचे दर
‘पार्क प्लस’ मोफत अॅप असून सर्व ॲण्ड्रॉईड मोबाईलवर उपलब्ध आहे. दुचाकीच्या तीन तासांच्या पार्किंगसाठी २० रुपये आकारण्यात येणार आहेत. तीन तास चारचाकी वाहन पार्क करायचे असले, तर ३० रुपयांपासून शुल्क सुरू होते. अॅपवरून मासिक पासही खरेदी करण्याचा पर्यायही आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पार्किंग सेवा असणार आहे.

भारतभरातील वाहनमालकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ‘पार्क प्लस’मध्ये आम्ही नेहमीच समविचारी संस्थांच्या शोधात असतो. बेस्टशी झालेल्या भागीदारीतून मुंबईकरांसाठी अनेक स्मार्ट सामाईक पार्किंग पर्याय खुले होणार आहेत. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
- अमित लखोटिया, सीईओ व संस्थापक, पार्क प्लस

या ठिकाणी असेल पार्किंग सुविधा
कुलाबा
मुंबई सेंट्रल
वांद्रे
वरळी
दिंडोशी
आणिक
बॅक-बे
अंधेरी बस स्थानक (पश्चिम)