माझं पेण संघर्ष समितीने महामार्ग एक तास रोखला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझं पेण संघर्ष समितीने महामार्ग एक तास रोखला
माझं पेण संघर्ष समितीने महामार्ग एक तास रोखला

माझं पेण संघर्ष समितीने महामार्ग एक तास रोखला

sakal_logo
By

पेण, ता. १६ (वार्ताहर) : बारा वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे याविरोधात माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने आज मुंबई-गोवा महामार्गावरील पेण पशुसंवर्धन कार्यालयाजवळ समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी एक तास महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजूकडील लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या महामार्गावरील खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच प्रवास करणे नकोसे झाले असल्याने याविरोधात आज माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पेणमधील हजारो नागरिकांनी महामार्ग एक तास रोखून धरल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबवण्यात आली. एक तास महामार्ग रोखून धरल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पेण प्रांत कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले.
यादरम्यान प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नॅशनल हायवेचे अधिकारी यशवंत घोटकर यांनी आंदोलनकर्त्यांना माहिती देताना सांगितले की, आपल्या मागणीनुसार पेण खारपाडा ते कासूपर्यंत टप्पा तसेच अंतर्गत रस्ते १५ तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे खड्डे भरून पूर्ण करणार असून पळस्पे ते कासू काँक्रीटीकरणासाठी २३९ करोड रुपये आले असून लवकरच तेही काम सुरू होईल. वाशी नाका ते गडब फ्लायओव्हरसाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल; तर वडखळ ते धरमतर रस्ता जेएसडब्ल्यूच्या सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे. काही खड्डे असतील ते सुसज्ज पद्धतीने चांगले भरण्यात येऊन टोल सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकारी यांनी लेखी पत्र आंदोलकांना दिले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
------------------


महामार्गावर यम अवतरला
------------------------
महामार्गावर मानवी साखळी करून बसलेल्या आंदोलनामध्ये गडब येथील तरुण सुशील कोठेकर हे यमाच्या पेहरावात रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाले होते. हा रस्ता घातक झाला असून मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

हायकोर्टाचे ताशेरे
राज्यातील अनेक महामार्ग सुसज्ज आणि खड्डेमुक्त झाले आहेत; मात्र मुंबई-गोवा हा एकमेव महामार्ग यापासून वंचित राहिलेला आहे. मोठमोठे खड्डे, खराब अंतर्गत रस्ते, साईटपट्ट्यांची दुरवस्था, साईन बोर्डची व्यवस्था नाही, गतिरोधक नाही यासह पेण हद्दीत बांधण्यात आलेल्या बंदिस्त पुलामुळे शहर आणि ग्रामीण भाग यांची ओळख पुसत चाललेली असून भविष्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे येथे भयानक अवस्था होणार असून हा रस्ता वापरण्यायोग्य नसल्याचे हायकोर्टानेसुद्धा ताशेरे ओढले आहेत.