अखेर पदपथ झाला मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पदपथ झाला मोकळा
अखेर पदपथ झाला मोकळा

अखेर पदपथ झाला मोकळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : शहरातील पदपथांवर दुकानदार, विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून हे पदपथ पादचाऱ्यांसाठी आहेत की दुकानदारांसाठी असा प्रश्न पडतो. दिवाळीच्या तोंडावर पालिका प्रशासनाला जाग आली असून बाजारातील प्लास्टिक पिशव्यांवर तसेच पदपथांवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली येथील पदपथावरील शेड्सवर पालिकेने कारवाई केली असून गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच हा पदपथ मोकळा झाला आहे, अशी प्रांजळ कबुली पालिका अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नाकर्तेपणावर दिली आहे.
पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ बांधण्यात आले असले तरी त्यावर दुकानदार, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाऱ्यांना पदपथांचा उपयोग होत नसून रस्त्यावर वाहनांच्या गर्दीतून त्यांना पायपीट करावी लागते. याविषयी वारंवार नागरिकांकडून ओरड केली जाते; परंतु नागरिकांच्या समाधानासाठी किरकोळ कारवाई केली जाते. पुन्हा काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त सुधाकर जगताप, स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी फ प्रभागाचे सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी पाथर्ली रोडवरील बीएसयूपी इमारतीसमोरील पदपथावर फर्निचर, कापडी शेड लावून अतिक्रमण केलेले सुमारे २२ फर्निचर विक्रीचे शेड्स निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. पदपथावरील सर्व लाकडी फर्निचर जेसीबी व ट्रकचा वापर करून १० कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा पदपथ स्वच्छ करीत मोकळा करण्यात आला. या कारवाईनंतर सहायक आयुक्त वाघचौरे यांनी मागील अनेक वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण कारवाई होऊन पदपथ नागरिकांसाठी पूर्णपणे रिकामा करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

………………...

चिंचपाडा येथेही कारवाई
या कारवाईसोबतच कल्याण पूर्व चिंचपाडा येथील पदपथावरील १५ शेड्स, १० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दोन हातगाड्या जप्त करत दुकानदारांकडून तीन हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच ह प्रभागातील घनश्याम गुप्ते रोडवरील १२० लहान-मोठ्या बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली.
……………………….

फ मार्केट परिसरातील अतिक्रमण जैसे थे
एक पदपथ रिकामा करत पालिकेने आपली पाठ थोपटवण्याचा प्रयत्न केला असला तरी शहरातील फ प्रभागातील मार्केट परिसरातील पदपथांवर अद्यापही दुकानदारांचे अतिक्रमण कायम आहे. या पदपथांवरील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.