शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज
शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज

शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो; मात्र आज हवामानबदल, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडलाय. या आपत्तीला तोंड देण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे. हवामान बदल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांचे आंबा बागायत व कृषी क्षेत्रातील एकूणच योगदान वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकोदगार डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले.
हवामानबदलाचा फलोत्पादनावर होणारा परिणाम, त्यानुसार आवश्यक असलेली कृषीप्रक्रिया सिंचनव्यवस्था यावर नुकतीच महत्त्‍वपूर्ण परिषद मुंबईत पार पडली. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने याचे आयोजन केले होते. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर या परिषदेला उपस्थित होते. मागील चार ते पाच वर्षात हवामानबदल हे जागतिक आव्हान ठरले आहे. त्याचा मोठा परिणाम कृषी फलोत्पादन क्षेत्रावर झाला आहे. यामुळे राज्यातील आंबा, भाजीपाला आदींचे उत्पादन घटून निम्म्यावर आले आहे. अनेकदा अतिवृष्टीदेखील पीक खराब होण्यास कारणीभूत ठरते. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.
या वेळी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता सक्सेना, स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार सिंह, मुंबई शेअर बाजाराचे समीर पाटील, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर यांच्यासह कृषी तसेच सिंचन क्षेत्रातील मान्यवरांनी या परिषदेत मार्गदर्शन केले.

प्रतिभावंतांचा सत्‍कार
पृथा शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री टिळेकर, सिंदखेड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश आप्पा कदम, मुलुख पर्यटन दौडचे संचालक बाळासाहेब पिलाने, बारामती येथील प्रल्हाद वरे, फलटण येथील कल्याण जगन्नाथ काटे, फनसकिंग मिथिलेश देसाई, अजय तेंडुलकर, सिंधुदुर्ग येथील विष्णू मौर्ये, म्युनिसिपल मजदूर संघाचे वसंत जाधव, रॉयल कॉलेज डोंबिवलीचे प्राचार्य डॉ. विवेक पाटील आदी रायगड कोकणासह राज्यातील कृषी क्षेत्रातील सधन, प्रगतशील शेतकरी व प्रतिभावंत मान्यवरांचा डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला.