नवी मुंबईत साकारणार बंजारा भवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत साकारणार बंजारा भवन
नवी मुंबईत साकारणार बंजारा भवन

नवी मुंबईत साकारणार बंजारा भवन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : नवी मुंबईत बंजारा भवन, पोहरादेवी विकासाच्या बंद पडलेल्या कामाला तातडीने चालना देणे तसेच सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी सुट्टी देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाला आश्वासने दिली, असून लवकरच सिडको तसेच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी ठाण्यातील हायलँड मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बंजारा भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. दिलेला शब्द पाळतो म्हणूनच ४० आमदार माझ्यासोबत आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शब्द दिला की, मी माघार घेत नाही, हाही माझा स्वभाव आहे. चांगले दिवस असतील तर सर्वच असतात. पण, संकटकाळी सोबत राहतो, तोच खरा मित्र असतो. तसेच संकटकाळात सहकाऱ्यांच्या सोबत उभा राहणे, हा माझा स्वभाव असून मंत्री संजय राठोड यांच्यावर आलेल्या संकटावेळी मी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो. म्हणूनच सर्व संकटांवर मात करत राठोड पुन्हा मंत्री झाले. असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

बंजारा समाजाकडून सत्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता टॅटू काढायची फॅशन आली आहे. त्याचे जनक बंजारा समाज आहे. बंजारा समाजाकडे वनौषधींचा ठेवा आहे. देशभ्रमंती करताना हा समाज ज्या मार्गावरून गेला तेथे ते सर्व राष्ट्रीय महामार्ग झाले. हा समाज ज्या ठिकाणी थांबला, तेथे त्यांनी विहिरी आणि तलावांची निर्मिती केली. इंग्रजांच्या लढ्यातही हा समाज अग्रेसर होता. त्याला चिरडण्याचा प्रयत्न झाला; पण तो डगमगला नाही, असे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी काढले.

--------------------------
बंजारा समाज वंचित राहणार नाही
बंजारा समाजाने महाराष्ट्रच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. निसर्गावर प्रेम करणारा हा समाज जिद्द, चिकाटी आणि मेहेनतीमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आल्याने हा समाज कुठेही वंचित राहणार नाही. त्यांना न्याय देण्याचे काम हे सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.

मी फक्त ट्रेलर : देवेंद्र फडणवीस
मी ट्रेलर म्हणून काम करतो, तर मुख्यमंत्री आल्यावर पिक्चर सुरू होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या वेळी त्यांनी आघाडी सरकारचा समाचारही घेतला. पोहरादेवी ठिकाणाचा विकास करून जागतिक दर्जाचे स्थळ करण्यासाठी आम्ही १०० कोटींचा निधी मंजूर केला होता; पण गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने एकही पैसा दिला नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला; पण आता मुख्यमंत्री शिंदे आहेत आणि अर्थमंत्री मी आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही, असेही ते म्हणाले.