फराळनिर्मितीतून महिलांची ‘दिवाळी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फराळनिर्मितीतून महिलांची ‘दिवाळी’
फराळनिर्मितीतून महिलांची ‘दिवाळी’

फराळनिर्मितीतून महिलांची ‘दिवाळी’

sakal_logo
By

वसई, ता. १७ (बातमीदार) : दिवाळीत चकल्या, करंजीसह विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला जातो. यासाठी विविध साहित्याची जमवाजमव केली जाते. पण यंदा साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यानुसार बजेट आखून पदार्थ तयार करण्यात महिला व्यस्त आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच दिवाळीचा फराळ करता येतोच असे नाही. त्यामुळे नोकरदारवर्ग तयार घरगुती फराळाला पसंती देत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणाला वेग येणार आहे, पण यंदा महागाईमुळे फराळाच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळीत खुसखुशीत चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू, चिवडा यासह शेव, करंजीसह विविध प्रकारच्या फराळाला अधिक मागणी असते. हा फराळ तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे; तर नोकरी, व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांना हौस असूनही बाहेरून फराळ आणण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून घरगुती पदार्थ तयार करणाऱ्या महिला, महिला बचत गट यांना उत्पन्नाचे नवे माध्यम खुले झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फराळ तयार करण्यासाठी एकाच ठिकाणी महिला एकत्र काम करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा फराळ उत्तम प्रकारे पॅक केला जात आहे. तसेच फराळाच्या पदार्थांची चव, स्वच्छता, तेलाचा वापर आणि त्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यावर भर दिला जात आहे. यंदा २० टक्के फराळासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाली आहे. त्यामुळे किमतीत फरक असला तरी ग्राहक मात्र महिलांनी तयार केलेल्या घरगुती फराळाला पसंती देत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेले दोन वर्षे सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे रोजगारावर गदा आली, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी दिवाळी साजरी करताना हात आखडता घ्यावा लागला होता. याचा परिणाम घरगुती फराळ तयार करणाऱ्या महिलांच्या व्यवसायावर झाला होता; परंतु यंदा हे निर्बंध मागे घेण्यात आल्याने उत्साह द्विगुणित झाला आहे. यामुळे घरगुती फराळाच्या मागणीत वाढ झाल्याचे महिला बचत गटांकडून सांगण्यात आले. सध्या आलेल्या ऑर्डरप्रमाणे फराळ बनवून तो विक्री केला जात आहे. काही महिलांचा समूह आलेल्या ऑर्डर घरपोच करत आहे. हा घरगुती दिवाळीचा फराळ चविष्ट पदार्थ असल्याने त्याची मागणी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील महिलांना आर्थिक हातभार लागत आहे.
------------------------
कॉम्बो ऑफर
काही महिलांनी फराळावर कॉम्बो ऑफर अशी योजना आखली आहे. यात सर्व फराळ घेतल्यावर सवलतीचे दर आकारले जात आहेत. त्यामुळे आपसूकच ग्राहक आकर्षित होत असून येथील फराळ हा परदेशात देखील नातेवाईकांना पाठविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
----------
महागाईची झळ
फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सिलिंडरच्या किमती वाढल्याने फराळाच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची झळ सोसावी लागत असून तरीही दिवाळीला फराळाची चव घेण्यासाठी नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
-------------
ऑनलाईन मागणीकडे पाठ
एकीकडे ऑनलाईनचे फॅड मोठ्या प्रमाणात रुजू लागले आहे; परंतु यंदा ऑनलाईन फराळापेक्षा घरगुतीच घेण्याकडे सर्वसामान्यांचा अधिक भर आहे. त्यामुळे थेट ग्राहक व विक्रेते असा व्यवहार केला जात आहे. कधीकधी ऑनलाईन मागवलेले फराळ चांगले नसते, म्हणूनही घरगुती फराळ बनवणाऱ्या महिलांकडून फराळ घेण्यावर भर दिला जात असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.
-------------
ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही महिला एकत्र येत फराळ तयार करतो. सर्व प्रकारचे पदार्थ एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांकडून मागणी आहे. दर थोड्याफार प्रमाणात वाढले असले तरी नफा कमी घेऊन विक्री करत आहोत, पण यामध्ये गुणवत्ता जपली जात आहे.
- यती राऊत, दिवाळी फराळ व्यावसायिक
------------
असे आहेत दर
भाजणीची चकली ५०० रु. किलो
चिवडा ४०० रु. किलो
शेव ४०० रु. किलो
गोड, खारी शंकरपाळी ४०० रु. किलो
बेसन लाडू २४ रु. नग
रवा लाडू २४ रु. नग
करंजी २४ रु. नग