पोलादपूरमध्ये सरपंचपदाबाबत संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलादपूरमध्ये सरपंचपदाबाबत संभ्रम
पोलादपूरमध्ये सरपंचपदाबाबत संभ्रम

पोलादपूरमध्ये सरपंचपदाबाबत संभ्रम

sakal_logo
By

पोलादपूर, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यातील तुर्भे विभागातील तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, वजरवाडी तुर्भेखोंडा या चारी ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून स्थानिक पातळीवर ग्राम विकास आघाडी व इतर आघाड्या करून या ग्रामपंचायती लढल्याने ग्रामपंचायतीचे सरपंचपद महाविकास आघाडीचे की बाळासाहेबांची शिवसेना, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तुर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार सुरेखा शिवराम गोळे यांना ३१९ व निशा नरेश शेलार यांना १७७ मते मिळाली. शिंदे गटाच्या सुरेखा गोळे या सरपंचपदासाठी निवडून आल्या. तुर्भे खुर्दमध्ये श्रीराम विकास आघाडीचे गोविंद दगडू उतेकर यांना ३३८ मते मिळाली असून ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यांनी तुकाराम काळू उतेकर (मते २८१) यांचा पराभव केला.
तुर्भे खोडामध्ये सरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीच्या कविता केशव खेडेकर (मते १०८) या विजयी झाल्या. त्यांनी प्रमिला प्रमोद महाडिक (मते १०१) यांचा पराभव केला; तर वझरवाडीमध्ये संभाजी चंद्रकांत जाधव (३२९ मते) हे सरपंचपदी निवडून आले असून त्यांनी हंस ज्ञानदेव शिंदे (मते २८५) यांचा पराभव केला. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवर निवडणुका लढविण्यात आल्या. चार ग्रामपंचायतींमध्ये ७५.२७ टक्के मतदान झाले होते.

शिंदे गटाचा तीन ग्रामपंचायतींवर दावा
स्थानिक आमदार बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी या ग्रामपंचायतींकडे स्वतः लक्ष दिले होते. सध्या तरी तीन ग्रामपंचायतींवर हा गट दावा करीत आहे, मात्र स्थानिक पातळीवर निवडलेले सरपंच जोपर्यंत उघडपणे कोणत्याही गटाचे समर्थन करत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे, याबाबत संभ्रम कायम राहणार आहे.