डोंबिवली शहर मृत घोषित होणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली शहर मृत घोषित होणार ?
डोंबिवली शहर मृत घोषित होणार ?

डोंबिवली शहर मृत घोषित होणार ?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची दुरवस्था असो की शहरभर पसरलेला कचरा... कल्याण-डोंबिवलीकर फक्त सोशल मीडियावर आवाज उठवताना दिसतात. इतर शहरांतून आलेले राजकीय नेते, कलाकारांनी कल्याण-डोंबिवलीच्या दुरवस्थेवरून येथील जनता गप्प कशी बसते, अशी टिप्पणी देखील केली; मात्र तरीही जनता मूग गिळून गप्प आहे. समाजाच्या या भूमिकेवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विवेक पंडित यांनी प्रकाश टाकला आहे.
समाजशास्त्रज्ञांच्या मते जिथे संवेदना, प्रतिकार, विरोध नाही, अशा गोष्टी, व्यावहारिकदृष्ट्या, ‘मृत’ मानाव्यात!! यामुळे आता डोंबिवली शहर मृत घोषित होणार? असा संदेश देणारा फलक शाळेच्या बसवर लावण्यात आला असून हा फलक सर्वांचे लक्ष वेधत आहे. याआधीही पंडित यांनी समाजाचे कान उघडणारे चॅनेल फलक बसवर लावले आहेत; मात्र आता कल्याण-डोंबिवलीकरांना कधी जाग येते हे पाहावे लागणार आहे.

शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा नियमित फटका शालेय विद्यार्थ्यांना बसतो. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्नांना विद्या निकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित हे वारंवार वाचा फोडत असतात. शाळेच्या बसवर तसे संदेश देणारे फलक ते लावत असतात. स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात निस्वार्थी लोकप्रतिनिधी कधी मिळतील, जनतेच्या समस्या तत्परतेने दूर करणारे प्रशासन कधी मिळेल, जनता आपले हक्क आणि जबाबदाऱ्या ओळखून कधी वागेल, असा सवाल जनतेला करत सुराज्याची पहिली पहाट कधी होईल, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर कोरोना काळात प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू होता. प्रशासनाने सांगायचे तसे नागरिकांनी वागायचे. लोकशाहीचा मूळ आधार जनता आहे; मात्र त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतले जात नाहीत. म्हणूनच मार्च २०२० पासून लोकशाही हरवली आहे, अशी टीका करत फलक लावले होते. तसेच ‘डोंबिवली एक सोशिक शहर’ आणि ‘आठवण शाळा बंद आहेत’ असे संदेश देणारे फलक बसवर लावत प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी आपल्या लेखणीतून विरोध दर्शवला होता.
डोंबिवलीकरांनो जागे व्‍हा
पुन्हा एकदा शाळेच्या बसवरील फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत, पण केवळ संदेश वाचून, एखाद्या समस्येवर समाज माध्यमावर बोलून नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता पंडित यांनी डोंबिवली शहर मृत घोषित होणार, अशी टीका जनतेच्या वर्तनावर केली आहे. यामुळे आता तरी या संदेशामागील मथितार्थ समजून घेत जनतेला जाग येते का याची वाट पहिली जात आहे.