वेश्‍वी, नवेदर नवगावमध्ये आघाडीचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेश्‍वी, नवेदर नवगावमध्ये आघाडीचा झेंडा
वेश्‍वी, नवेदर नवगावमध्ये आघाडीचा झेंडा

वेश्‍वी, नवेदर नवगावमध्ये आघाडीचा झेंडा

sakal_logo
By

अलिबाग, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यातील वेश्‍वी व नवेदर नवगाव ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आघाडीला मतदारांनी कौल दिला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आघाडीचा झेंडा फडकला आहे. आमदार जयंत पाटील राहत असलेल्या वेश्‍वी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती; परंतु या निवडणुकीत आघाडीने करिश्मा करीत शेकापला मोठा धक्का दिला आहे. वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकापचे सात सदस्य व आघाडीचे चार सदस्य निवडून आले असून नवेदर नवगावमध्ये शेकापचे सहा व आघाडीचे पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींवर शेकापच्या सदस्यांचे बहुमत असल्याचे दिसून आले आहे.
अलिबाग तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी घेण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. रविवारी झालेल्या मतदानानंतर वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले होते. मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तहसील कार्यालयाच्या सभागृहात आठ टेबल ठेवण्यात आले होते. सुमारे २१ कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला नवेदर नवगाव ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू करण्यात आली.

वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये आघाडीचे गणेश गावडे यांना १,५७८ मते मिळाली असून शेकापचे प्रफुल्ल पाटील यांना १,३०७ मते मिळाली. तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीत ११ जागांपैकी ७ जागांवर शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत.
नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ग्राम परिवर्तन विकास आघाडीच्या प्रियांती घातकी व शेकापचे अंकिता जैतू यांच्यात लढत झाली. यामध्ये आघाडीच्या प्रियांती घातकी यांना १,५०७ मते, तर अंकिता जैतू यांना १०७० मते मिळाली. नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या ११ जागांपैकी सहा जागांवर शेकापचे व पाच जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले.

वेश्‍वीत शेकापला धक्‍का
वेश्‍वी ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरली आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाची ही लढाई होती. अनेक वर्ष वेश्‍वी ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यास आघाडीला यश आले आहे; तर नवेदर नवगावमध्येही गेली अनेक वर्ष प्रशासन होते. या ठिकाणी आघाडीने मुसंडी मारून शेकापला नामोहरम केले आहे. दोन्ही ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले, तरीही सरपंचपदावर आघाडीने शिक्कामोर्तब करून शेकापला मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

-----------
सरपंचपदाचे दावेदार
नवेदर नवगाव
प्रियांती घातकी - ग्रामविकास आघाडी- १,५०७

वेश्वी
गणेश गावडे - ग्रामविकास आघाडी - १५७८