दोन वर्षातच गायमुख चौपाटीची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षातच गायमुख चौपाटीची दुरवस्था
दोन वर्षातच गायमुख चौपाटीची दुरवस्था

दोन वर्षातच गायमुख चौपाटीची दुरवस्था

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : घोडबंदर रोडवरील पहिली गायमुख चौपाटी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्‍यात आली. या ठिकाणी विजेचे खांब असूनही वीज नसल्यामुळे अवघ्या दोन वर्षांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असल्‍याची बाब मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली.
घोडबंदर रोड येथील गायमुख येथे ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या संकल्पनेतून ठाण्यातील गायमुख येथे चौपाटी विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. ठाण्यातील पहिली चौपाटी ही गायमुख येथे विकसित करण्यात आली आहे. या चौपाटीचे उद्‌घाटन शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ ला करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या वतीने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे ४० कोटींचा खर्च करण्यात आला. ठाण्यातील नागरिकांना मनोरंजन व विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही चौपाटी विकसित करण्यात आली. शिवाय चौपाटीला हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले असून दोन वर्षांतच झालेली दुरवस्था धक्कादायक आहे. या चौपाटीच्या कामात महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करूनही दोन वर्षांत या चौपाटीची दुरवस्था झाल्‍याचे पाहायला मिळत आहे. चौपाटी तर अंधारात आहेच, शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे एकही सुरक्षा रक्षक दिसून येत नाही. या चौपाटीवर लावण्यात आलेले विद्युत खांब सुस्थितीत असले तरी विद्युत प्रवाह सुरू नाही. त्यामुळे या अंधाराच्या साम्राज्यात लहान मुलेही खाडीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चौपाटीवर स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. येथे जे नळ बसवण्यात आले होते, तेही गायब झालेले आहेत.
............................

कोट :-
गायमुख चौपाटीची झालेली दुरवस्था ही खूपच धक्कादायक असून यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड तसेच ठाणे महापालिका प्रशासन दोघेही जबाबदार आहेत. ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी पालिकेचे प्रशासन किती जागरूक आहेत, याची कल्पना नव्या आयुक्तांना यावी हीच अपेक्षा आहे.
- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित व विधी विभाग