कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांवर असते. मात्र, या ठिकाणी डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास विलंब होत असल्याबाबतच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्‍या आहेत. अचानक करण्यात येणाऱ्या भेटीदरम्यान अधिकारी अथवा कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच वारंवार वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाणे जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासह सरकारच्या विविध योजना व त्यांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यावर असते. त्यानुसार पाच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत विविध विकासात्मक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणे, नरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरी बांधणे, ग्रामपंचायत विभागाकडील सर्व योजनांचे कामकाजावर सनियंत्रण व पर्यवेक्षण, जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा ग्रामविकास निधी, यशवंत पंचायत राज अभियान, कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी, सांसद आदर्श ग्रामयोजना अशी आदी विकासात्मक कामे राबविण्यात येत आहेत. ही कामे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांमार्फत राबविण्यात येत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. अनेकदा या ठिकाणी नेमण्यात आलेला अधिकारी व कर्मचारी शासकीय नियमानुसार शिपाई यांच्यासाठी सकाळी ९.३० ते ६.३० वा. अशी वेळ असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ९.४५ ते ६.१५ अशी वेळ निर्धारित करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
थेट निलंबनाची कारवाई
ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ मनुज जिंदल हे तालुक्यातील पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत समितीच्या कार्यालयांना, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अचानक भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आल्यास त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच वारंवार वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिंदल यांनी दिला आहे. या निर्णयामुळे लेटलतिफ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जरब बसण्याची शक्‍यता आहे.