ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

sakal_logo
By

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : जव्हारसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात बऱ्याच शेतकऱ्यांची उंचावर किंवा दरीमध्ये शेती आहे. शेतीचा पीक विमा मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी अहवालाकरिता आवश्यक असलेली माहिती अपलोड करण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल व इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र डोंगराळ भागात रेंज नसल्याने इंटरनेट सेवा बाधित असते. त्यामुळे तहसील कार्यालयातून काही ठिकाणच्या ई-पीक पाहणी नोंदी या ऑफलाईन कराव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत.
येथील नागरिकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन म्हणजे शेती. खरीप हंगामातील चार महिने शेतीमध्ये काबाडकष्ट करून त्यातून आलेल्या उत्पन्नातून वर्षभर घर चालवावे लागते. येथील शेतकरी पिढीजात शेती व्यवसाय करीत आहे. शासनाने ई-पीक पाहणी थेट शेतकऱ्यांनीच करावी, असे परिपत्रक काढल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती साथ देत नाही, तर दुसरीकडे शासनाच्या शेतीविषयक परिपत्रकामुळे डोकेदुखी वाढली आहे. तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्कचा अभाव आहे. परिणामी ई-पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ई-पीक नोंदींपासून वंचित राहत आहेत. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने पिकांची नोंद करायची कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संपूर्ण पिकांची नोंद करणे नेटवर्कशिवाय अवघड आहे. जरी नेटवर्क उपलब्ध असले तरी बऱ्याचदा अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पीक पेरा कमी दाखवत आहे. अशातच धान विक्रीसाठी आवश्यक सात-बारावर शेतीची नोंद कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांवर शासनाच्या परिपत्रकानुसार धान विक्रीपासूनसुद्धा वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सात-बारा नोंद ऑफलाईन पद्धतीने तलाठ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

…………………………...
जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक पेरा पाहणी नोंदणी आपल्या शेतातूनच करायची आहे. अनेक बोगस लाभार्थी याचा गैरफायदा घेतात. याला आळा घालण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांनी केवळ ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे.
- विजय मोरे, तलाठी, जव्हार
………………….
जव्हारसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागात शेती करण्यासाठी डोंगर-दऱ्या चढून जावे लागत आहे. बऱ्याचदा अशा भौगोलिक परिस्थितीमुळे या ठिकाणी अँड्रॉईड मोबाईल व इंटरनेटची समस्या असल्याने ही पीक पाहणी अहवाल नोंदी ऑफलाईन केल्यास येथील शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल.
- इम्रान कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते, जव्हार