Mumbai आसनगाव ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election
आसनगाव ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे वर्चस्व

Mumbai : आसनगाव ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे वर्चस्व

खर्डी : शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या निकालात काही ठिकाणी सदस्यांचे बहुमत येऊनही सरपंचपद विरोधकांकडे गेले आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. काही ठिकाणी सरपंच अपक्ष व त्रिशंकू परिस्थिती असल्याने उपसरपंचपदासाठी रस्सीखेच असणार आहे.

तालुक्यात सर्वच राजकीय पक्ष अनेक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व आल्याचे सांगत आहेत; पण याबाबत निवडून आलेल्या सरपंचपदाचे उमेदवारच स्पष्टीकरण देऊ शकत असल्याने मतदार संभ्रमात आहेत. राजकीय पक्षाची सरपंचपदाच्या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ लागल्याचे दिसत आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजप पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. येथील सरपंचपदी रविना कचरे निवडून आल्या आहेत. कळंभे-बोरशेती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे रवींद्र हिलम विजयी झाले आहेत.

खर्डी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसन्मान पॅनेलच्या सहा जागांसहीत मंगला गावित निवडून आल्या असून ग्रामविकासच्या पाच जागा, तर संघर्ष पॅनेलच्या दोन जागा आल्याने त्रिशंकू परिस्थिती झाली असून उपसरपंचपदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.

दळखण ग्रामपंचायतीमध्ये भगवान मोकाशी यांच्या पॅनेलने बाजी मारली असून स्वतः ते सदस्यपदी निवडून आले असून सरपंचपदी वाघ यांनी विजय मिळवला आहे. धामणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुगंधा वीर व सदस्यपदी अशोक वीर हे दाम्पत्य विजय झाले आहे. वरस्कोळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका आवटे यांनी विजय मिळवला आहे.

चिठ्ठीद्वारे निर्णय
ठीला ग्रामपंचायत निवडणुकीत शीतल ठाकरे यांना ३०५ व लक्ष्मी मुकणे याना ३०५ अशी समान मते मिळाल्याने अधिराज केदारे या २ वर्षीय मुलाने तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्यासमोर चिठ्ठी काढून शीतल ठाकरे हे विजयी झाल्या आहेत.

वेहलोंडे येथे शिंदे गटाचे वर्चस्व
वेहलोंडे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे वर्चस्व आले आहे. येथील सरपंचपदी भीमा भोये विजयी झाल्या आहेत. उंबरखांड ग्रामपंचायतीवर शिवसेना बाळासाहेबांची (शिंदे गटाचे) वर्चस्व आले असून सरपंचपदी तुकाराम वड निवडून आले आहेत. सारंगपुरी (खैरे) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता आली असून सरपंचपदी नारायण दरोडा निवडून आले आहेत.