पालघर तालुक्यातील वाजली शिट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर तालुक्यातील वाजली शिट्टी
पालघर तालुक्यातील वाजली शिट्टी

पालघर तालुक्यातील वाजली शिट्टी

sakal_logo
By

पालघर, ता. १७ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या झालेल्या मतमोजणीत शिवसेना ठाकरे गट व उद्धव ठाकरे गट या दोघांच्या गटामुळे तालुक्यात बहुजन विकास आघाडीला व मनसेला फायदा झाला आहे. तालुक्यात सर्वात जास्त ग्रामपंचायत बहुजन विकास आघाडीकडे, तर मनसेने प्रथमच तालुक्यात खाते उघडून सरपंचांसह दोन ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
पालघर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. संध्याकाळी सहा वाजले तरी मतमोजणी काही ग्रामपंचायतींची सुरूच होती. काही ग्रामपंचायतींच्या मतमोजणीवर आक्षेप घेतल्यामुळे बोईसर व बेटेगाव या ग्रामपंचायतींची फेर मतमोजणी घेण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल विलंबाने येत होते.
सफाळे ग्रामपंचायत निवडणुकीत बविआ विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. मात्र या सर्वांचा धुव्वा उडवून सर्व जागा बविआने जिंकून सरपंचपदी तनुजा कवळी या निवडून आल्या; तर उमरोळी येथे बविआ विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असा सामना होता. मात्र यावर बविआने बाजी मारून येथेही सरपंचपदी प्रभाकर पाटील निवडून आले. बविआने १७ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवल्याचा दावा केला आहे.
पालघर तालुक्यात मनसेने दोन ग्रामपंचायतींवर सरपंचांसह बहुमत मिळवले व तालुक्यात प्रथमच खाते उघडले. केळवे ग्रामपंचायतीत शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेला बविआने पाठिंबा दिला. त्यामुळे १७ पैकी १३ जागा मनसेने मिळवल्या. येथे सरपंचपदी मनसेचे संदीप किणी हे निवडून आले; तर नांदगाव ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे सेना व बहुजन विकास आघाडी अशी युती झाली होती. मात्र येथेही मनसेने नऊ पैकी सहा जागा जिंकल्या व सरपंचपदी मनसेचे समीर मोरे हे निवडून आले.
घरे अंभोरे या ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडीने विजय संपादन करून सरपंचपदी विनोद मोरे हे निवडून आले आहेत. बेटेगाव येथेही गाव पातळीवर परिवर्तन पॅनेल, तरुण परिवर्तन पॅनेलच्या सुनिता कोंम या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

...
बोईसरचा निकाल आयोगाकडे
बोईसर ग्रामपंचायत सरपंचपदाचे बविआचे दावेदार अनिल रावते यांची विजयी घोडदौड सुरू असताना अचानक ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगून अचानक मतमोजणी थांबवून निकाल राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे रावते यांनी लेखी हरकत घेतली. या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार असल्याचे बविआच्या जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे यांनी सांगितले. सदरचा निकाल आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील शिंदे यांनी सांगितले.