राज संकटमोचक की अजेंडा सेटर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज संकटमोचक की अजेंडा सेटर?
राज संकटमोचक की अजेंडा सेटर?

राज संकटमोचक की अजेंडा सेटर?

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १७ ः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घ्यावा, या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
पोटनिवडणूक टाळा हे आवाहन करत आपण अजेंडा सेटर झालो आहोत हे राज यांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका समर्थकाने व्यक्त केली. गेले काही दिवस राज ठाकरे भाजपच्या सल्ल्याने काम करतात अशी टीका केली जाते; मात्र या वेळी राज ठाकरे म्हणाले आणि भाजपने ऐकले अशी स्थिती निर्माण झाली आहे. मनसेच्या गोटात यामुळे आनंद पसरला होता. मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आभाराचे पत्र पाठवले आहे.
ते या पत्रात लिहितात, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.
या पत्राच्या शेवटी आपला मित्र राज ठाकरे असेही त्यांनी लिहिले आहे; मात्र हातात नसलेल्या निवडणुकीतून बाहेर पडण्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्राने भाजपला सेफ पॅसेज मिळवून दिला, असे मानले जात आहे.