
जिम ट्रेनर ते मराठी सिनेअभिनेता
विरार, ता. १८ (बातमीदार) : वसईतील गौरव कदम हा तरुण सध्या मराठी सिनेसृष्टीत चांगलाच चर्चेत आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हरिओम या मराठी सिनेमात गौरवने मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेने तरुणांना भुरळ घातली आहे. या भूमिकेचे वसईकरांकडून कौतुक होत आहे.
गौरव कदम हा वसईतील ओमनगर परिसरात राहत असून त्याने प्रथमच मराठी सिनेसृष्टीत हरिओम या सिनेमाद्वारे पदार्पण केले आहे. या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली असून यामध्ये त्याने विविध स्टंट केले आहेत. गौरवला लहानपणापासूनच शरीर तंदुरुस्त ठेवण्याची आवड होती. यासाठी त्याने स्वतः तंदुरुस्त राहत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जिममध्ये प्रथम जिम ट्रेनर म्हणून काम केले. आजही तो खासगी जिम ट्रेनर म्हणून पोलिस अधिकारी, बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री यांना प्रशिक्षण देत आहे. दरम्यान त्याने छोट्या पडद्यावरदेखील काही काळ काम केले आहे. मात्र मराठी सिनेमात काम करण्यासाठी त्याची आई प्रेमा कदम यांनी प्रोत्साहन दिल्याचे गौरव सांगतो. जिमनॅस्टिकचे शिक्षण घेतल्यामुळे आज सिनेमात जिमनॅस्टिक स्टंट करू शकत असल्याचे गौरवने सांगितले.
विशेष म्हणजे गौरवला सामाजिक जाण असल्याने तो सामाजिक कार्यालादेखील हातभार लावत असतो. आतापर्यंत त्याने गरजूंना धान्यवाटप, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, शिक्षणासाठी आर्थिक मदत केली असून पुढेही समाजकार्य करत राहणार असल्याचे त्याने सांगितले.