भोसले कुटुंब कंदील बनवण्यात दंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले कुटुंब कंदील बनवण्यात दंग
भोसले कुटुंब कंदील बनवण्यात दंग

भोसले कुटुंब कंदील बनवण्यात दंग

sakal_logo
By

भारती बारस्कर
शिवडी, ता. १८ ः दीपावली हा प्रकाशाचा सण. विविध प्रकाशरंगांनी दाहीदिशा उजळून निघालेल्या असतात त्या पणती, दिवे आणि आकर्षक रंगांच्या कंदिलांनी. दादर पश्चिम रानडे रोड विठ्ठलवाडी येथील एका छोट्याशा घरात राहणाऱ्या भोसले कुटुंबातील प्रत्येक सदस्य पर्यावरणपूरक कंदील बनवण्यात मग्न असतो. गेली ७० वर्षे त्‍यांची परंपरा कायम आहे.
दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे दादरच्या बाजारपेठेमध्ये विविध आकर्षक पारंपरिक आकाश कंदिलांपासून कपड्यांचे कंदीलही बाजारात दिसत आहेत; मात्र या गर्दीत भोसले कंदीलवाले आजही टिकून आहेत. वडिलोपार्जित कंदील व्यवसाय ते गेल्या ७० वर्षांपासून आपल्या छोट्याशा घरात करत आहेत. त्यांच्याकडे गोल, षटकोनी, सिंगल आणि डबल असे पर्यावरणपूरक कंदील विक्रीसाठी उपलब्ध असून षटकोनी कंदिलाला सर्वाधिक मागणी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही यंत्राचा (मशीन) वापर न करता हाताच्या साह्याने काट्या, पतंग पेपर, छोटे आरसे, फिलिंग पट्ट्या, दोरा, गम या सहित्यापासून ते कंदील तयार करतात.

५०० कंदिलांची निर्मिती
दिवाळी उत्सवाच्या एक महिना आधीपासून कंदील बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. दिवसा नोकरी, इतर कामे व रात्री कंदील बनवण्याचे काम करण्यात येते. यात वंदना मोहिते, भारती मोहिते, अविनाश मोहिते तसेच ममता कडेमणी, रोहित कडेमणी, कल्पेश अहिरे व निखिल अहिरे या सात जणांची टीम मिळून कंदील बनवतात. जवळपास पाचशेहून अधिक कंदील केवळ हाताने तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे कंदील विक्रीसाठी बाजारात जाण्याची गरज भोसले कंदीलला लागत नाही. सर्व कंदील मागणीनुसार तयार करून विकण्यात येतात. मागणीत वाढ झाल्यास मागणी तेवढा पुरवठा करण्यात येत असल्याने जास्त मालाचा साठादेखील होत नाही. साधारण ३५० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत भोसले कंदील वाल्यांकडे कंदील उपलब्ध असून एक महिना आधीपासूनच याचे बुकिंग केली जाते.

दिवाळीनिमित्ताने आता कंदिलांचा बाजार भरू लागल्याने कंदिलांचे अजून काही प्रकार बाजारात येतील. प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण आकाश कंदिलांना जास्त मागणी असते. बाजारात काय नवीन आहे, याची मागणी नागरिक करतात. त्यानुसार त्यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
- भारती मोहिते, कंदील निर्मात्‍या