
महापालिका शाळेत कलाकृतीचे प्रदर्शन
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः त्रिवेणी संगम महापालिका शाळेच्या सभागृहात आकाशकंदील तयार करणे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. या समारंभात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निवडक कलाकृतींना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कांदिवली पश्चिम येथील पालिका शाळेत आकाशकंदील व पणत्या तयार करणे, याबाबत प्रशिक्षण देऊन प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंदील आणि पणती तयार केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागातर्फे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशिका (प्र.) तृप्ती पेडणेकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.