
शॉकसर्किटमुळे चायनीज हॉटेलला आग
भांडुप, ता. १८ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम येथील चायनीज हॉटेलला मंगळवारी (ता. १८) सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. भांडुप पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन उन्हवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला बोलवून या आगीवर नियंत्रण मिळवले.
भांडुप येथील सरदार प्रतापसिंग रोडवरील शिवाजी तलावाच्या बाजूला असलेल्या भाऊ वडापाव सेंटरलगतच्या एका चायनीज हॉटेलमध्ये आज सकाळच्या सुमारास आग लागली. सकाळची वेळ असल्याने रहदारी नव्हती. ती त्यामुळे मोठी दुर्घटना होऊन कोणीही जखमी झाले नाही. मुख्य रस्त्यावर हे दुकान असून आजूबाजूला कपड्याची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील होणारा अनर्थ टळल्याचे नागरिकांनी सांगितले. या आगीत हॉटेलमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती नितीन उन्हवणे यांनी दिली.