पगार पण लिमिटेड घ्या..हे उत्तर चालणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पगार पण लिमिटेड घ्या..हे उत्तर चालणार नाही
पगार पण लिमिटेड घ्या..हे उत्तर चालणार नाही

पगार पण लिमिटेड घ्या..हे उत्तर चालणार नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार काही नागरिकांनी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याकडे केली. त्यांनी ताबडतोब कनिष्ठ अभियंता राजेश वसईकर यांना फोन करत कानउघाडणी केली. ठेकेदार काम करत नसल्याचे उत्तर येताच अहिरे संतापले. ठेकेदार काम करत नाही, तर तुम्ही हातावर हात धरून बसले आहात का, असा सवाल करत हे उत्तर चालणार नाही. पगार पण मग तुम्ही लिमिटेड घ्या, अशा शब्दांत वसईकरांची कानउघडणी केली. तसेच दिवाळी आधी शहरातील रस्ते खड्डे मुक्त होतील, असा विश्वास अहिरे यांनी या वेळी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांवरून शहराचे वाभाडे निघाले आहेत. पावसाळ्यानंतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने खड्डे बुजवून रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी १३ ठेकेदारांची नेमणूकदेखील केली; मात्र या कामात सातत्य नसल्याने अनेक रस्त्यांवर खड्डे जैसे थे आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने खड्डे भरण्यासाठी कंबर कसली आहे. मंगळवारी डोंबिवलीतील टिळक रोडवरील रस्त्याची केडीएमसीचे नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पाहणी केली.
या वेळी पालिकेचे सचिव संजय जाधव, माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे उपस्थित होते. रस्त्यांचे काम हे चांगल्या दर्जाचे होत आहे; परंतु पाऊस सातत्याने पडत असल्याने ते टिकत नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झाली असून पुढील तीन दिवस सलग चोवीस तास हे काम सुरू असून दिवाळीपूर्वी शहर खड्डेमुक्त करू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


………………...
युद्धापातळीवर काम
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पावसाची कृपा राहिल्यास व चोवीस तास काम करत रस्ते खड्डेमुक्त करण्याचा मानस या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

……….
दिवाळी भेट मिळेल
या वेळी येत्या दिवाळीमध्ये विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीकरांना चांगले दिवाळी गिफ्ट देतील, असे या वेळी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.